सटाणा नगर परिषदेसमोर महिलांचा ठिय्या

37

सामना ऑनलाईन | सटाणा

शहरात गेल्या 40 दिवसांपासून नळांना थेंबभरदेखील पाणी येत नसल्याने शहारातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुमारे चार तास ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांशी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी भेट घेऊन लवकरच पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.

गेल्या वर्षभरापासून शहरात भीषण पाणीटंचाई असताना एप्रिलमध्ये सटाणा येथे जिल्हाधिकाऱयाची भेट घेऊन पाणीटंचाईबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी शहरातील विहिरी अधिग्रहीत करून काहीअंशी पाणीटंचाईवर मात करण्यात आली, मात्र गेल्या 40 दिवसांपासून नळांना पाणी येत नसल्याने महिलांनी नगरपरिषदेवर ठिय्या आंदोलन केले.

यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी आंदोलनकर्त्या महिलांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱयांकडे केळझर धरणातून टँकरद्वारे पाणी आणून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भेट घेणार असल्याचे सांगत लवकरच शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर महिलांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनात ऍड. सरोज चंद्रात्रे, माजी नगरसेवक वंदना सोनवणे, वंदना भामरे, मंगला सोनवणे, राजश्री पंडीत, वनिता सोनवणे, लता पगार, विजया सोनवणे, राधाबाई पगार, संगीता सोनवणे, वंदना सोनवणे, सुनंदा पगार, शुभांगी चंद्रात्रे, कुंदा कुलकर्णी, लीना मांडवडे, सुजाता सोनवणे आदींचा समावेश होता.

सटाणा शहराला सुमारे दररोज सुमारे 52 लाख लिटर पाणी लागते. आजमितीस नगरपरिषदेकडे 1.5 लाख लिटर पाणी उपलब्ध होत असते. त्यातच शहरातील दहा विंधन विहिरी अधिग्रहीत केलेल्या असून यामध्ये चार विहिरींतून सुमारे 50 हजार लिटर पाणी उपलब्ध होत आहे. यामुळे केळझर धरणातून टँकरद्वारे पाणी आणून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या