
कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकचे काम रखडल्याने रहिवाशांची तसेच पादचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत होती. याची दखल घेत शिवसेनेने याप्रकरणी आवाज उठवत पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे यासाठी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून हे काम 30 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची लेखी हमी पालिका प्रशासनाने दिली आहे.
कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम अनेक दिवसांपासून रखडल्याने रहिवाशांना पर्यायी मार्गाने स्थानक गाठावे लागत होते. त्याचबरोबर फलाट क्रमांक एकला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामालाही विलंब होत होता. याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी प्रशासनाला लेखी पत्राद्वारे तक्रार नोंदवत पाठपुरावा केला होता व हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पत्राची दखल घेत पालिका प्रशासनाने फलाट क्रमांक 1 ला जोडणारा रस्ता (रॅम्प, जिना) 10 डिसेंबर रोजी खुला केला जाईल. याशिवाय पादचारी पुलाचे उर्वरित काम 30 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी माहिती दिली असून त्याबाबतची लेखी हमी पालिका प्रशासनाने दिली आहे. शिवसेनेच्या या प्रयत्नांमुळे लवकरच रखडलेली कामे पूर्ण होणार असून रहिवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.



























































