आंबा बागायतदारांसाठी देवगड येथे चर्चासत्राचे आयोजन

आंबा बागांवर कीटकनाशकांची फवारणी करूनही किडीचा बंदोबस्त होत नाही, यासाठी आंबा बागायतदारांना मार्गदर्शन होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सिंधुदुर्ग जिल्हा कृषी पदवीधर संघ, “स्नेह सिंधू” यांच्या माध्यमातुन कोकण कृषी विद्यापीठ यांचे किटक शास्त्रज्ञ, यांची संयुक्त मार्गदर्शन चर्चा ,21 जानेवारी रोजी भवानी मंगल कार्यालय, तळेबाजार येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.

या चर्चेत शेतकरी उत्पादकांची प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यासंदर्भात या विषयातील तज्ञाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या चर्चासत्रात बागायतदारांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. जिल्हा बँक संचालक ऍड अविनाश माणगावकर यावेळी उपस्थित होते.

या पुढे बोलताना सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा व काजू ही नगदी पिके आहेत. देवगड सारख्या भागात मोठ्या प्रमाणात आंबा पिकाचे घेतले जाते. शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन हे आंबा पिकावर अवलंबून आहे. चालू वर्षी थंडी कमी दिवस राहिली त्यामुळे आंब्याला मोहोर आलेला नाही. निसर्गातील बदलामुळे गेल्या पंधरवड्यात अवेळी पाऊस झाला. त्यामुळे ज्या ठिकाणी थोडाफार मोहोर आला होता त्याठिकाणी तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला.

येत्या आठवड्याभरात पुन्हा थंडीचे प्रमाण वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिलेले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून आंबा पिकात मोठ्या प्रमाणात घट होणारी आहे. आंबा पिकावर कीटकनाशकांची फवारणी करूनही किडीचा बंदोबस्त होत नाही. यासाठी आंबा बागायतदारांना मार्गदर्शन होण्यासाठी या चर्चा सत्राचे आयोजन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या