जगनमोहन रेड्डी यांच्या गाडीखाली चिरडून कार्यकर्त्याचा मृत्यू

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्या स्वागतासाठी उसळलेल्या गर्दीत एका 53 वर्षीय व्यक्तीचा कारखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रेड्डी हे शनिवारी सत्तेनपल्ली येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड झुंबड उडाली. गर्दी इतकी अनियंत्रित झाली की सुरक्षा रक्षकांनाही ती आवरता आली नाही.

जगनमोहन रेड्डी ज्या कारमधून कार्यक्रमस्थळी पोहोचले होते, त्याच कारखाली चिरडून कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. चिल्ली सिंगा असे या कार्यकर्त्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. रेड्डी यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारच्या दिशेने धाव घेतली. हातात बॅनर आणि फुलांच्या माळा घेऊन हे कार्यकर्ते धावले. या वेळी चिल्ली सिंगा धावत असताना रेड्डी यांच्या कारखाली सापडले.