बँकेत जमा करण्यासाठी दिलेले पैसे घेऊन पळून गेलेल्या कर्मचाऱ्याला अखेर पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. महावीर सुरेश शिरवाळे असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 4 लाख रुपये हस्तगत केले आहेत. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.
तक्रारदार यांचे पवई येथे मनी एक्स्चेंजचे ऑफिस असून त्या ऑफिसमध्ये महावीर शिरवाळे गेल्या पाच वर्षांपासून काम करत आहे. विश्वासू कर्मचारी असल्याने तक्रारदार हे महावीर शिरवाळेला रोज 10-12 लाख रुपये बँकेत जमा करण्यासाठी देत असायचे. गेल्या आठवड्यात तक्रारदार यांनी महावीर शिरवाळेला 8 लाख रुपये बँकेत जमा करण्यासाठी दिले होते. झटपट श्रीमंत होण्याच्या इराद्यात असलेल्या महावीर शिरवाळेने ते पैसे बँकेत जमा न करता पैसे घेऊन तो पळून गेला. बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेलेला शिरवाळे सायंकाळपर्यंत कार्यालयात न आल्याने तक्रारदार यांनी शिरवाळेच्या मोबाईलवर फोन केला. मात्र शिरवाळेचा फोन सतत बंद येत होता. तक्रारदार यांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पवई पोलिसांनी शिरवाळेविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
महावीर शिरवाळेच्या अटकेसाठी एक पथक तयार करण्यात आले. पोलीस महावीरचा शोध घेत होते. मात्र तो सतत फोन बदलत असल्याने त्याला पकडण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. महावीर शिरवाळे हा धुळ्याला गेल्याची माहिती समजताच पोलीस तेथे गेले. मात्र तो तेथे नव्हता. महावीर शिरवाळे हा पुण्यात लपून बसल्याची माहिती समजल्यावर पोलिसांनी तेथे सापळा रचला. सापळा रचून महावीर शिरवाळेला गजाआड केले. पोलिसांनी त्याच्याकडून 4 लाख रुपये जप्त केले आहेत.























































