
सिंधू जल कराराबाबत हस्तक्षेप करण्याची विनंती फेटाळत जागतिक बँकेने पाकिस्तानला जोरदार धक्का दिला आहे. जागतिक बँकेला या कराराशी काहीही देणेघेणे नसून यात बँकेची मध्यस्थाची भूमिकाही नाही, अशा स्पष्ट शब्दांत जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी सिंधू जल करारात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
सिंधू जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तानातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती अडचणीत सापडली आहे. देशात जलसंकट निर्माण होऊ नये यासाठी पाकिस्तानने जागतिक बँकेला याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. या पार्श्वभूमीवर अजय बंगा यांनी जागतिक बँकेची भूमिका मांडली. बंगा म्हणाले हिंदुस्थान सरकारने सिंधू जल करार स्थगित केलेला नाही. सध्या सिंधू जल करार थांबवला आहे. हा करार स्थगित करण्यासाठी कोणताही नियम किंवा कायदा नाही. त्यामुळे हा करार संपवायला हवा किंवा त्याजागी नवीन करार करायला हवा. जेव्हा दोन्ही देश त्यासाठी मान्यता देतील तेव्हाच हे शक्य होईल असे बंगा म्हणाले.
जागतिक बँकेची सहाय्यकाची भूमिका
हिंदुस्थान आणि पाकिस्तानात जर कोणते मतभेद असतील तर जागतिक बँक केवळ सहाय्यक म्हणून भूमिका बजावेल. जागतिक बँक पुठल्याही प्रकारचा निर्णय देणार नाही. उलट दोन्ही देशांमधील मतभेद मिटवण्यासाठी एखाद्या निष्पक्षपणे काम करणाऱया त्रयस्थाचा किंवा संस्थेचा शोध घेण्यास मदत करेल, असे बंगा म्हणाले. जागतिक बँकेचे प्रमुख काम प्रशासनिक आणि आर्थिक आहे. सिंधू जल कराराची सुरुवात झाली तेव्हा एक विश्वस्त निधी उभारण्यात आला होता. हा निधी मध्यस्थी करणाऱयांचे शुल्क अदा करण्यासाठी वापरण्याचे ठरले होते. जागतिक बँकेची यात याहून अधिक पुठल्याही प्रकारची भूमिका नाही, असे बंगा म्हणाले.