
हिंदुस्थानच्या महिला बॉक्सर्संनी पोलंडमध्ये पार पडलेल्या युवा जागतिक बॉक्ंिसग स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. सात खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना दमदार पंचेस लगावत हिंदुस्थानला सात सुवर्ण पदके मिळवून दिली. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा 20 सदस्यीय चमू पाठवण्यात आला होता. हिंदुस्थानच्या सात महिलांनी सुवर्ण तर तीन पुरूषांनी कांस्य पदक जिंकत एकूण दहा पदके आपल्या नावावर केली. 56 किलो वजनी गटात सचिनने हिंदुस्थानला आठवे सुवर्ण पदक मिळवुन दिले. याचा अर्थ हिंदुस्थानने या स्पर्धेत 11 पदकांवर शिक्कामोर्तब केलाय. याआधी 2010 साली या स्पर्धेत हिंदुस्थानने दहा पदके जिंकली होती. पोलंडमधील हिंदुस्थानची कामगिरी काबिल ए तारीफ ठरलीय हे विशेष.
नागपूरच्या अल्फिया पठाणची झेप
नागपूरच्या अल्फिया पठाण हिने 81पेक्षा अधिक किलो वजनी गटात युवा युरोपियन चॅम्पियन मोल्दोवाच्या दारीया कोझोरेझ हिचा 5-0 अशा फरकाने धुक्वा उडवला. देदीप्यमान विजयानंतर ती म्हणाली, युवा जागतिक स्पर्धेत पदक जिंकण्याचा विश्वास होता. माझ्या सर्व प्रशिक्षकांनी माझ्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. लॉकडाऊनमध्येही मी कसून सराव होते. आता मी 2024 सालातील ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ऑलिम्पिकसाठी सहभागी होण्यासाठी मला वजन घटवावे लागणार आहे. त्यामध्ये 75 किलो वजनी गटात सहभागी होईन, असेही ती म्हणाली.
मेरी कोमच्या शिष्याचीही कमाल
हिंदुस्थानची दिग्गज बॉक्सर मेरी कोमच्या मार्गदर्शनाखाली इंफाल येथील अॅकडमीत बॉक्ंिसगचे धडे गिरवणारी टी सनमचा चानू हिने 75 किलो वजनी गटात डाना डिडे हिला 5-0 अशा फरकाने नमवले आणि गोल्डन पंच लगावला. हरयाणाच्या गितीकाने 48 किलो वजनी गटात स्थानिक खेळाडू नतालिया कुकझेवस्का हिला 5-0 असे सहज हरवले आणि हिंदुस्थानसाठी सुवर्ण कामगिरी केली.
आशियाई युवा चॅम्पियन बनले जागतिक चॅम्पियन
नाओरेम बेबीरोजिसाना चानू (51 किलो वजनी गट) व पूनम (57 किलो वजनी गट) हे आशियाई युवा चॅम्पियन जागतिक चॅम्पियन बनले हे विशेष. मणीपूरच्या नाओरेम बेबीरोजिसाना चानू हिने युरोपियन ज्युनियर चॅम्पियन व्हॅलेरीया लिंकोवा हिला 5-0 असे नमवले, तर पूनम हिने फ्रान्सची अनुभवी बॉक्सर स्थेलीन ग्रोसी हिला हरवले.
विंका, अरूंधतीचीही बाजी
विंका हिने 60 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या हुल्दीझ शयाखमेतोवा हिला पराभूत केले. तसेच अरूंधती चौधरी हिने पोलंडच्या बार्बरा मार्किनकोवस्का 69 किलो वजनी गटात धूळ चारली. हिंदुस्थानी महिलांची या स्पर्धेतील देदीप्यमान कामगिरीनंतर चोहोबाजूंनी त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.





























































