जगज्जेतेपदासाठी हिंदुस्थानी युद्ध! ‘राणी’ हम्पीविरुद्ध ‘राजकुमारी’ दिव्या यांच्यात आजपासून संघर्ष

हिंदुस्थानी बुद्धिबळच नव्हे तर हिंदुस्थानी क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट घडलीय. महिला बुद्धिबळाच्या विश्वचषकात कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या हिंदुस्थानी महिलांनी अंतिम फेरी गाठलीय. गुरुवारी हम्पीने अत्यंत संघर्षपूर्ण विजयानंतर अंतिम फेरी गाठली, तेव्हाच हिंदुस्थानी बुद्धिबळाने जग जिंकलं. आता फक्त जगज्जेतेपदाचा मुकुट कुणाच्या शिरपेचात खोवला जाणार, हेच ठरायचेय. ती दिव्याही असेल किंवा हम्पीसुद्धा. कुणीही जिंकलं तरी जगज्जेते आपणच होणार आहोत. शनिवारपासून बुद्धिबळाचे हे जागतिक पटावरील हिंदुस्थानी युद्ध सायंकाळी 4.30 वाजल्यापासून सुरू होईल.
काल जगज्जेतेपद आपल्या खिशात आलं तेव्हाच हिंदुस्थानी बुद्धिबळाने आपले बळ अवघ्या जगाला दाखवून दिले होते. जगाच्या डोळय़ात अजूनही प्रश्न आहे, हिंदुस्थानने ही बाजी जिंकली कशी? आणि आपल्याकडून उत्तर जातं-एकीने अनुभवाचा डाव खेळला, दुसरीने आत्मविश्वासाची चाल खेळली.
बुद्धिबळ खेळ कंटाळवाणा असतो? असं कालपरवापर्यंत सर्वांनाच वाटायचा. पण इथेही सस्पेन्स असतो, इमोशन असतं, आणि  गंमत म्हणजे अंतिम फेरीत एकाच देशाच्या दोन मुली! त्यासुद्धा हिंदुस्थानच्या. हे पाहून अवघ्या जगाला प्रश्न पडलाय, याला अंतिम फेरी’ म्हणावं की ‘कौटुंबिक लढत’?
जगाच्या नजरेत या जगज्जेतेपदाचा थरार निघून गेला असेल, पण तसे किंचीतही नसेल. हम्पी बुद्धिबळाची राणी आहे आणि दिव्या राजकुमारी. दोघीही आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी आजपासून एकमेकाRशी भिडतील. दोघींनी मिळून चीनच्या वर्चस्वाची भिंत उद्ध्वस्त करत बुद्धिबळ जगतात हिंदुस्थानचा तिरंगा फडकवला आहे, तो अंतिम फेरीत आणखी डौलाने फडकेल.
हम्पीकडून दिव्याच्या कामगिरीचे कौतुक
महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीपूर्वी दिव्या देशमुखच्या अभूतपूर्व खेळीचं भरभरून काwतुक कोनेरू हम्पीने केलेय. ‘माझ्यासाठी आणि सर्व बुद्धिबळप्रेमींसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. पण एक खेळाडू म्हणून उद्याचा सामना कठीण असेल. दिव्याने संपूर्ण स्पर्धेत विलक्षण खेळ दाखवलाय,’ असं हम्पीने चीनच्या लेई टिंगजेवर उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
सध्या इंटरनॅशनल मास्टर असलेल्या 19 वर्षांच्या दिव्या देशमुखने या स्पर्धेत मातब्बर खेळाडूंना पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. तिची ही कामगिरी हिंदुस्थानी बुद्धिबळासाठी अत्यंत स्फूर्तिदायक अशीच आहे.
दुसरीकडे 38 वर्षांच्या हम्पीने उपांत्य फेरीतील अत्यंत तणावपूर्ण लढतीत चीनच्या लेई टिंगजे वर मात केली. हा सामना सहा तासांहून अधिक काळ चालला, ज्यात दोघांमध्ये वारंवार डाव बरोबरीत सुटत होते. सुरुवातीला खराब खेळलेल्या हम्पीच्या हातून सामना निसटला असे वाटत असताना तिने जबरदस्त कमबॅक करत अंतिम फेरी गाठण्याचा कारनामा केला. हम्पीच्या विजयामुळे हिंदुस्थानच्या बुद्धिबळाला पुन्हा एकदा झळाळी मिळाली आहे.

चला जगज्जेते होऊया…

अंतिम सामना शनिवार, 26 जुलै सुरू होईल.
अंतिम फेरीचे फॉरमॅट
अंतिम फेरीमध्ये दोन क्लासिकल डाव खेळवले जातील.
पहिला डाव – 26 जुलै, सायंकाळी 4.30 वाजल्यापासून.
दुसरा डाव – 27 जुलै, सायंकाळी 4.30 वाजल्यापासून.
जर दोन्ही डाव बरोबरीत सुटले तर टायब्रेक लढत 28 जुलै रोजी खेळविली जाईल.

क्लासिकल डावांसाठी वेळमर्यादा

– प्रत्येक खेळाडूसाठी पहिल्या 40 चालींसाठी 90 मिनिट.
– त्यानंतर उर्वरित डावासाठी 30 मिनिटांची वाढ.
– प्रत्येक चालीनंतर 30 सेकंदांची वाढ पहिल्या चालपासून लागू.
टायब्रेक फॉरमॅट
1 दोन रॅपिड डाव – 10 मिनिटे आणि 10 सेपंद वा
2 जर अजूनही बरोबरीत खेळ असेल तर दोन ब्लिट्झ डाव – 5 मिनिटे आणि 3 सेपंद वाढ
3 तरीही बरोबरी झाल्यास – दोन सुपर ब्लिट्झ डाव –
3 मिनिटेआणि 2 सेपंद वाढ
4 त्यानंतर आवश्यकतेनुसार 3 अधिक 2 ब्लिट्झ डावांमध्ये विजेता ठरेपर्यंत खेळ सुरू राहील.
बक्षीस रक्कम
 जगज्जेती – 50,000 डॉलर्स (सुमारे 41.6 लाख)
 उपविजेती – 35,000 डॉलर्स  (सुमारे 29.1 लाख)

आज काय होणार?

हिंदुस्थानी बुद्धिबळाची राणी विरुद्ध राजकुमारी एकमेकाीचा ‘किंग’ पाडण्यासाठी चाल खेळतील. दोघीही आपल्याच असल्यामुळे हीसुद्धा आपली आणि तीसुद्धा आपलीच, हा विषय येणारच. पण तोंड कुणाचं गोड होणार, हा प्रश्न असेल. दोघींनी आधीच जग जिंकलंय. कुणीही जगज्जेतेपद उंचावलं तरी मान हिंदुस्थानचीच उंचावणार आहे. ‘भारतमाता की जय’चा नाद घुमेल आणि हिंदुस्थानच्या नारींची शक्तीही जगाला दिसेल. कुणीही जिंको, जगज्जेतेपद आपलेच असले तरी दोघींनाही तमाम हिंदुस्थानींच्या मनापासून शुभेच्छा. जगज्जेती भव!