हिंदुस्थानच्या विजयाची नऊलाई; क्रिकेट चाहत्यांना दिली दिवाळीची फटाकेबाज विजयी भेट

रोक सको तो रोक लो… वर्ल्ड कपच्या साखळीत हिंदुस्थान नॉनस्टाप. हिंदुस्थानच्या अव्वल पाचही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करण्याचा पराक्रम करत रचलेल्या 410 धावांसमोर नेदरलॅण्ड्सचा अननुभवी संघ 250 धावांतच आटोपला आणि हिंदुस्थानने 160 धावांच्या विक्रमी विजयासह नऊच्या नऊ साखळी सामने जिंकण्याचा पराक्रम केला. विजयाचे नवरंग उधळल्यानंतर आता वानखेडेवर विजयादशमी साजरी करण्यासाठी अपराजित हिंदुस्थानी संघ येत्या 15 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी भिडेल.

हिंदुस्थानने आज आपल्या अब्जावधी चाहत्यांची दिवाळी धमाकेदार करताना चौकार-षटकारांचे फटके फोडले. डचसमोर 411 धावांचे आव्हान उभारले तेव्हाच हिंदुस्थान विजयाचा बॉम्बही पह्डणार हे स्पष्ट होते. मोहम्मद सिराजने विकेटचा पहिला बॉम्ब पह्डल्यानंतर डच हिंदुस्थानी वेगवान त्रिकुटापुढे नांगी टाकतील, असे वाटले, पण तसे घडले नाही. नेदरलॅण्ड्सच्या प्रत्येक फलंदाजांने आपले योगदान दिल्यामुळे त्यांच्या धावा वाढत होत्या, पण पराभव अटळ होता. टप्प्याटप्प्याने बुमरा-सिराज आणि यादव-जाडेजाने विकेट घेत डचला 50 वे षटक टच करू दिले नाही. हा एकतर्फी सामना रोहित शर्माने तेजा निदामनुरूचा विकेट घेत 250 धावांवर संपवला. तेजाने सहा षटकारांची बरसात करत 54 धावा ठोकल्या. त्याच्यामुळे डच 250 पर्यंत पोहोचू शकला. डचकडून तोच अर्धशतक साजरे करू शकला.
त्याआधी आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हिंदुस्थानी फलंदाजांनी चौकार-षटकारांची आतषबाजी केली. वर्ल्ड कपमधील 413 ही धावसंख्या गाठण्यास हिंदुस्थानला अवघ्या 3 धावा कमी पडल्या. मात्र 37 चौकार आणि 16 षटकारांची फटकेबाजी करत डच गोलंदाजांना धू धू धुतले. एवढेच नव्हे तर आघाडीच्या पाचही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत नवा इतिहासही रचला.

वर्ल्ड कपच नव्हे तर वन डे क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस विक्रमांचे फटाके पह्डण्याचा होता, अर्धशतकांचा होता, शतकांचा होता आणि द्विशतकांचाही होता. रोहित शर्मा आणि शुबमन गिलने आजही भन्नाट सलामी दिली. 12 व्या षटकांतच सलामीवीरांनी हिंदुस्थानी संघाचे शतक फलकावर लावले. गिल 32 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकार ठोकत 51 धावा करून गेला. मग रोहितची अर्धशतकी खेळी आजही शतकापर्यंत पोहोचली नाही. त्यानेही 61 धावा केल्या.

शतकी सलामी आणि वैयक्तिक अर्धशतके झळकावल्यानंतर रोहित-गिल बाद झाले, पण त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने 71 धावांची भागी रचली. विराटच्या बॅटमधून आणखी एक अर्धशतकी खेळीचा जन्म झाला, पण ती खेळी 51 धावांवरच विझली. 29 व्या षटकांत संघाचे द्विशतक पूर्ण होताच विराटची खेळीही पूर्ण झाली.

अय्यर-राहुलची द्विशतकी भागी
3 बाद 200 नंतर खऱया अर्थाने दिवाळीचे फटाके पह्डले ते श्रेयस आणि राहुलने. दोघांची सुरुवात काहीशी अडखळत होती. पण सूर सापडल्यानंतर चेंडू सापडणार नाही, असे उत्तुंग फटके दोघांच्या बॅटमधून निघाले. 48 चेंडूंत पन्नाशीवर पोहोचलेल्या श्रेयसने 84 व्या चेंडूंवर आपले पहिले वन डे शतक साजरे केले. राहुलने तर 40 व्या चेंडूवर 50 तर 62 व्या चेंडूवर शतक ठोकले. या दोघांचा वेग इतका भन्नाट होता की, 78 चेंडूंत शतकी आणि पुढच्या 47 चेंडूंत द्विशतकी भागी साजरी केली.

अव्वल पाचही अर्धशतकवीर
वैयक्तिक शतकांसह चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागी रचताना दोघांनी एका डावात पहिल्या पाचही फलंदाजांनी 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा नवा पराक्रम हिंदुस्थानी संघाच्या नावावर नोंदविला. वन डेच्या इतिहासात पहिल्या पाचही फलंदाजांनी अर्धशतके झळकावण्याचीही पहिलीच वेळ असून एका डावात पाच फलंदाजांनी अर्धशतके साजरे करण्याची किमया चौथ्यांदाच केली गेली आहे. याआधी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियन (दोनदा) फलंदाजांनी अशी कामगिरी केली होती. हिंदुस्थानची संख्या चारशेपार गेल्यावर राहुल 102 धावांवर बाद झाला, तर अय्यर 128 धावांवर नाबाद राहिला.

विक्रमांच्या दुनियेतून…
हिंदुस्थानने सातव्यांदा 400 पेक्षा अधिक धावा केल्या. वन डेत सर्वाधिक आठ वेळा 400 पेक्षा अधिक धावा दक्षिण आफ्रिकेने केल्या आहेत.वर्ल्ड कपच्या इतिहासात अव्वल पाच फलंदाजांकडून अर्धशतके साजरी करण्याची पहिलीच वेळ. रोहित शर्मा (61), गिल (51), कोहली (51), अय्यर (ना. 128) आणि राहुल (102) यांनी हा पराक्रम केला. वन डेत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने दोनदा, तर एकदा पाकिस्तानने एका डावात पाच अर्धशतके ठोकली आहेत.

श्रेयस अय्यरने आपले वर्ल्ड कपमधील पहिले शतक झळकवताना या वर्ल्ड कपमध्ये 421 धावा करत वर्ल्ड कपमध्ये मधल्या फळीत सर्वाधिक 361 धावा करणाऱया युवराज सिंगला मागे टाकले. युवराजने 2011 मध्ये या धावा केल्या होत्या.

अय्यर-राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 208 धावांची भागी रचत 2007 साली मायकल क्लार्क- ब्रॅड हॉग यांनी केलेल्या 204 धावांच्या वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम भागीला मागे टाकले.

वर्ल्ड कपच्या इतिहासात कोणत्याही संघाचे अव्वल पाच फलंदाज सातत्याने खेळण्याची ही पहिलीच वेळ. हिंदुस्थानच्या शुभमन गिल (270), रोहित शर्मा (503), विराट कोहली (594), श्रेयस अय्यर (471) आणि केएल राहुल (347) यांनी अडीचशेपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी एकाही संघाच्या अव्वल पाच फलंदाजांना करता आलेली नाही.

विराट कोहलीने नवव्या सामन्यात सातवी 50 पेक्षा अधिक खेळी करत एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 7 अर्धशतकी खेळी करणाऱया सचिन तेंडुलकर (2003) आणि शाकिब अल हसनची (2019) बरोबरी साधली.