
कुणी मानो अगर ना मानो, पण आयसीसी वर्ल्ड कपमध्ये यजमानांची चलती आहे. हा योगायोग आहे की यजमानांची हवा, याचा अंदाज तुम्हीच बांधा. काहीजण म्हणत होते की, तुम्हाला वर्ल्ड कप जिंकायचंय ? मग वर्ल्ड कपचे आयोजन करा. वर्ल्ड कपचे यजमान व्हा. मग जगज्जेतेपद तुमच्याजवळ असेल.
यात खरंच तथ्य आहे का ? किंवा असेल का ? माहीत नाही. पण गेल्या तीन स्पर्धांत असंच घडलंय. घडत आलंय. वाटतंय आताही असेच घडेल. 2011 साली आपण वर्ल्ड कपचे आयोजन केले. 28 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आपण जगज्जेते बनलो. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने तब्बल 23 वर्षांनंतर वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवले आणि त्यांनीही जगज्जेतेपदाचा गवसणी घातली. 2019 मध्ये इंग्लंडने तब्बल दोन दशकांनंतर यजमानपदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी कधी नव्हे ते यश संपादले. तब्बल 44 वर्षांनतर त्यांनीसुद्धा जगज्जेतेपदाची चव चाखली.
गेल्या तीनही स्पर्धांत यजमान जगज्जेते ठरलेत. चौथ्यांदाही तसंच घडणार का? संकेत तर तसेच आहेत. म्हणून आपण अंतिम फेरीत धडक मारलीय. विशेष म्हणजे या गेल्या तीनही वर्ल्ड कपमध्ये यजमान संभाव्य विजेते म्हणून टॉपवर होते. 2011 साली हिंदुस्थानच जिंकणार. सारेच म्हणत होते. 2015 मध्येही ऑस्ट्रेलियाच बाजी मारणार, असे भाकीत सर्वांनीच वर्तवलेले. गेल्या वेळी तर सर्वांच्या मुखी इंग्लंडच्याच नावाचा बोलबाला होता आणि आता हिंदुस्थान हा फेव्हरेट आहे. एकही क्रिकेट पंडित नाही, जो हिंदुस्थानला संभाव्य जगज्जेता मानत नसेल.
यजमानपद म्हणजे जगज्जेतेपदाची खात्री, असे लोपं मानत असले तरी यात काही तथ्य नाही. जो संघ सर्वात जास्त मेहनत करतो तोच जिंकतो. क्रिकेटच्या भाषेत ज्याचा दिवस असतो, तोच विजेता ठरतो. गेल्या तीन स्पर्धांत यजमानांचा दिवस होता. ते जिंकले. यजमानपदाचा जितका फायदा असतो, तितकच नुकसानही असतं. त्यापेक्षा पैकपटीने दबाव असतो. घरच्या मैदानात खेळणे कधीही सोपे नसते. जसे प्रोत्साहन मिळते तशीच टीकाही होते. जिंकल्यावर जल्लोष होतो तर हरल्यावर शोककळाही पसरते. लोपं जीवापाड प्रेम करतात तर तसं जीवघेणं रागही व्यक्त करतात. सर्वकाही टोकाचं असतं.
मात्र गेल्या दीड महिन्यात हिंदुस्थानी संघावर कौतुकाचाच वर्षाव होतोय. सलग दहा सामने जिंकून हिंदुस्थानने इतिहास रचलाय. सलग इतके विजय केवळ ऑस्ट्रेलियानेच मिळवले आहेत. 2003 आणि 2007 साली ऑस्ट्रेलियाने अपराजित जगज्जेतेपद पटकावले होते. अशी कामगिरी केवळ तेच करू शकले होते. तसे 1996 साली श्रीलंकाही एकही सामना हरली नव्हती. पण दोन सामन्यांत त्यांना प्रतिस्पर्धी संघ न खेळल्यामुळे विजय बहाल करण्यात आला होता.
वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिले पाच वर्ल्ड कप यजमान कधीच जिंकला नव्हता. मात्र 1996 साली सहयजमान श्रीलंकेने वर्ल्ड चॅम्प होण्याचा इतिहास रचला होता. तीच यजमान जिंकण्याची पहिली वेळ होती. त्यानंतर 1999 ते 2007 सालापर्यंत यजमानांची झोळी रिकामीच राहिली होती. यादरम्यान इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमध्ये स्पर्धा रंगल्या आणि तीनही स्पर्धांत ऑस्ट्रेलियाने अभूतपूर्व यश संपादले. सलग तीन वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी करत त्यांनी अद्भुत कामगिरी केली. पहिल्या नऊ वर्ल्ड कपमध्ये केवळ एकदाच यजमान तोसुद्धा सहयजमान विजेता ठरला होता. त्यामुळे वर्ल्ड कपचे यजमानपद अपयशी मानले जायचे. यजमान म्हणजे हरणारच असे गणित असायचे. पण आता इतिहास बदललाय. काळही बदललाय. जे यजमानपद दुर्दैवी वाटायचे ते आता भाग्यशाली वाटू लागलेय. यजमान संघ जगज्जेते होण्याची हॅटट्रिक झाली तेव्हापासून यजमानांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. आता तर यजमान हिंदुस्थान अंतिम फेरीत पोहोचलाय. इतिहास साक्षी आहे की यजमान जगज्जेते होतात. जर हा योगायोग सत्यात उतरत असेल तर तो यंदाही उतरू दे. यजमानांचा जगज्जेतेपदाचा चौकार बसू दे. मी तर म्हणेन यजमानांचाच विजय असो.
























































