
हिंदुस्थानची तरुण नेमबाज सिमरनप्रीत कौर बरार हिने महिला 25 मीटर पिस्टल स्पर्धेत अप्रतिम पुनरागमन करत आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी फायनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर 50 मीटर रायफल थ्री पोजिशन चॅम्पियन ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि पुरुष 25 मीटर रॅपिड-फायर पिस्टलमध्ये अनिष भानवाला यांनी रौप्यपदके पटकाविली. या पदकांसह हिंदुस्थानने स्पर्धेत आतापर्यंत 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 6 पदके जिंकली आहेत. चीन तीन सुवर्णांसह पदकतालिकेत अव्वल असून, हिंदुस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
लीमा विश्वचषकात यंदा रौप्यपदक जिंकलेल्या 21 वर्षीय सिमरनप्रीतने अंतिम फेरीत 41 गुणांची चमकदार कामगिरी करत आपल्या कारकीर्दीतील सर्वात मोठा किताब जिंकला. तिने वर्ल्ड ज्युनियर विक्रमाचीही बरोबरी केली.
क्वालिफिकेशनमध्ये सिमरनप्रीत 585 गुणांसह पाचव्या स्थानावर होती. अंतिम फेरीत सुरुवातीला तीन निशाणे चुकवत ती आठव्या क्रमांकावर घसरली होती; परंतु नंतर सलग तीन परफेक्ट ‘5’ मारत तिने चीनच्या 10 मीटर एअर पिस्टल विश्वविजेत्या याओ कियानक्सुन (36 – रौप्य) आणि जर्मनीच्या माजी विश्वविजेत्या डोरेन वेनेपॅम्प (कांस्य) यांना मागे टाकले. हिंदुस्थानची ईशा सिंह सातव्या स्थानावर राहिली, तर मनू भाकर 581 गुणांसह नवव्या क्रमांकासह स्पर्धेतून बाद झाली.
ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरला 50 मीटर रायफल थ्री पोजिशनच्या अंतिम फेरीत 0.9 गुणांनी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. झेक प्रजासत्ताकच्या जिरी प्रिव्रात्स्की याने 414.2 गुणांसह सुवर्ण पटकाविले, तर ऑलिंपिक विजेता लियू युकुनने कांस्यपदक मिळविले. महिला थ्री पोजिशनमध्ये सिफत कौर सामरा (584 – 10वे स्थान) आणि महिला 25 मीटर पिस्टलमध्ये मनू भाकर (581 – 9वे स्थान) पात्रता फेरीतच गळाल्या.
पुरुष 25 मीटर रॅपिड फायर पिस्टलमध्ये अनिषने विश्वविजेता क्लेमेंट बेसागुएटविरुद्ध शूट-ऑफमध्ये जिद्दीने विजय मिळविला आणि सुवर्णाच्या शर्यतीत राहिला, मात्र चीनच्या पॅरिस ऑलिंपिक विजेत्या ली यूहोंग यांनी 33 गुणांसह सुवर्ण जिंकले. अनिषने 31 गुणांसह रौप्य, तर बेसागुएटने कांस्य मिळविले. हिंदुस्थानचा विजयवीर सिधू चौथ्या क्रमांकावर राहिला.



























































