
वर्ल्ड कपच्या तिकिटांसाठी मारामारी सुरू झाली आहे. ‘बुक माय शो’ या तिकीट ऍपवर मास्टरकार्ड धारकांसाठी हिंदुस्थानी सामन्यांची तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली होती, पण ती तिकिटे क्षणात सोल्ड आऊट झाली. एवढेच नव्हे तर तिकिटांच्या बुकिंगसाठी क्रिकेटप्रेमींना तासनतास वेटिंगवर राहावे लागल्याने त्यांनी आयसीसी आणि बीसीसीआयवर आपला संतापही व्यक्त केला. उद्यापासून सर्वांसाठी ऑनलाईन तिकीट विक्री सुरू होत असली तरी अल्प तिकिटांमुळे चाहत्यांना तिकीट बुकिंगऐवजी ऍपच्या क्रॅश कोर्सचा अधिक सामना करावा लागणार आहे.
हिंदुस्थानच्या वर्ल्ड कपच्या सामन्यांसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि प्रत्यक्ष तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर ते आयसीसी आणि बीसीसीआयला शिव्यांची लाखोली वाहणार, हेसुद्धा निश्चित आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंदुस्थानी नऊ साखळी सामन्यांची 50 हजार तिकिटेच ऑनलाइन उपलब्ध केली जाणार आहेत. या 50 हजार तिकिटांसाठी अवघ्या जगातून किमान कोटय़वधी चाहत्यांची झुंबड उडणे अपेक्षित असल्यामुळे तिकीट ऍप वारंवार हमखास क्रॅश होणार आणि हेच कारण सांगत चाहत्यांचा अपेक्षाभंग केला जाणार आहे. मुळात कमी तिकिटे उपलब्ध केल्यामुळे चाहत्यांचा राग ‘बुक माय शो’वर असला तरी याला आयसीसी आणि बीसीसीआयचे सामान्य चाहत्यांना कमी लेखणे हेच मुख्य कारण आहे.
हिंदुस्थानच्या प्रत्येक सामन्याच्या आसनक्षमतेच्या 10 ते 25 टक्के तिकिटेच सामान्य प्रेक्षकांसाठी ऑनलाईन उपलब्ध केल्यामुळे अवघ्या हिंदुस्थानात क्रिकेटप्रेमींच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळणार यात तीळमात्र शंका नाही. मास्टरकार्ड वर्ल्ड कपचे प्रायोजक असल्यामुळे त्याच्या धारकांना विशेष प्राधान्य दिले असले तरी त्यांच्या पदरी केवळ निराशाच पडली आहे. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणाऱया हिंदुस्थानी सामन्यांच्या तिकीट विक्रीदरम्यान चाहत्यांना वेबसाइट क्रॅश झाली, तिकिटांसाठी दोन-दोन तास वेटिंग राहावे लागले, तिकीट बुकच होत नाही आणि सर्वात शेवटी तिकिटेच सोल्ड आऊट झाली यापलीकडे काहीच मिळणार नाही, हेच वास्तव असेल. या अनुभवानंतर काही ठिकाणी चाहत्यांनी गोंधळ घातला तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीएक नसेल. या सर्व प्रकारांना आधीच त्रस्त असलेली आयसीसी आणि बीसीसीआय कशी सामोरे जाते, हे येत्या दिवसांत कळेलच.





























































