एपस्टिन फाइल्समध्ये नाव आल्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष आणि सीईओ बोर्गे ब्रेंडे यांनी गुरुवारी राजीनामा दिला. अमेरिकन लैंगिक शोषण गुन्हेगार जेफ्री एपस्टिनशी संबंधित फाइल्समध्ये त्यांचे नाव आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. एपस्टिनच्या फाइल्समुळे जगभरातील अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. ब्रेंडे २०१७ मध्ये WEF चे सीईओ बनले. त्यांच्यावर एपस्टाईनसोबत तीन बिझनेस डिनरमध्ये सहभागी झाल्याचा आणि ईमेल आणि मेसेजद्वारे त्यांच्याशी संवाद साधल्याचा आरोप आहे.

राजीनामा देण्याच्या निर्णयाबद्दल ब्रेंडे म्हणाले, “खूप विचार केल्यानंतर, मी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष आणि सीईओ पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी माझी आठ वर्षे खूप छान गेलेली आहेत. माझ्या सहकाऱ्यांच्या, भागीदारांच्या आणि इतरांच्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. मला वाटते की, फोरमने कोणत्याही व्यत्ययाशिवाय आपले काम सुरू ठेवण्याची वेळ आली आहे.”

ब्रेंडे यांनी त्यांच्या निवेदनात एपस्टिनचा उल्लेख केला नाही. WEF चे सह-अध्यक्ष आंद्रे हॉफमन आणि लॅरी फिंक यांनी सांगितले की ब्रेंडे यांच्या एपस्टिनशी असलेल्या संबंधांचा वकिलांनी स्वतंत्र आढावा घेतला आहे. ब्रेंडे यांच्या जागी अलोइस झ्विंगी अंतरिम अध्यक्ष आणि सीईओ म्हणून काम पाहतील. WEF वार्षिक दावोस शिखर परिषदेचे आयोजन करते, ज्यामध्ये जगभरातील राजकीय आणि व्यावसायिक नेते एकत्र येतात.