सिनर-अल्कराज पुन्हा जेतेपदासाठी भिडणार

जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला यानिक सिनर आणि त्याचा प्रमुख प्रतिस्पर्धी कार्लोस अल्कराज पुन्हा एकदा हंगामातील चौथ्या मोठया अंतिम सामन्यात भिडणार आहेत. दोघांनी एटीपी-डब्ल्यूटीए सिनसिनाटी मास्टर्स टेनिस ओपनच्या उपांत्य फेरीत सरळ सेटमध्ये विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

गतविजेत्या इटलीच्या सिनरने फ्रान्सच्या टेरेन्स अॅटमानेला 7-6 (7/4), 6-2 असे सहज पराभूत केले. दुसरीकडे द्वितीय मानांकित स्पेनच्या अल्कराजने उष्णतेने त्रस्त झाल्यानंतरही जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हवर 6-4, 6-3 असा विजय मिळवला. यापूर्वी या हंगामात दोघांमध्ये स्पेन्स ओपन आणि विम्बल्डनच्या अंतिम फेरीतील लढती झाल्या असून गेल्या महिन्यात ऑल इंग्लंड क्लबवर सिनरने अल्कराजला पराभूत करत आपले वर्चस्व दाखवले होते. 24 व्या वाढदिवशी सिन्नरने फ्रेंच खेळाडू अॅटमानचा स्वप्नवत प्रवास संपवला आणि आता 2014-15 मध्ये रॉजर फेडररनंतर सलग दोन वर्षे सिनसिनाटी किताब जिंकणारा पहिला खेळाडू होण्याची संधी त्याला मिळाली आहे. विम्बल्डननंतर प्रथमच स्पर्धेत उतरलेल्या सिनरने अद्याप एकही सेट गमावलेला नाही.