
मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी अंतिम सामन्यात नाटय़मय वळण पाहायला मिळाले. चीनचा वर्ल्ड नंबर 1 आणि विद्यमान विश्वविजेता शी यूकीला पाठीच्या दुखापतीमुळे थायलंडच्या कुनलावुत विटिडसर्नविरुद्ध चालू सामन्यातून माघार घ्यावी लागली. पहिला गेम 21-23 असा अटीतटीचा गमावल्यानंतर तीव्र वेदनांमुळे शी यूकीने सामना सोडण्याचा निर्णय घेतला आणि कुनलावुतने विजेतेपद बक्षीस लाभले.
सामन्यानंतर शी यूकीने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे कौतुक करताना म्हटले, ‘कुनलावुत नेहमीच अत्यंत मजबूत खेळाडू राहिला आहे. तो सध्या जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. विशेषतः फायनलसारख्या मोठय़ा मंचावर त्याच्याविरुद्ध खेळणे नेहमीच शिकवण देणारे ठरते.’
महिला एकेरीत दक्षिण कोरियाच्या ऑलिम्पिक विजेत्या एन से यंग हिने आपले वर्चस्व कायम राखत चीनच्या वांग झेईचा 21-15, 24-22 असा पराभव केला. दुसऱया गेममध्ये वांग झेईने जोरदार झुंज दिली, मात्र निर्णायक क्षणी संधी दवडावी लागली.
सामन्यानंतर ती म्हणाली, ‘मी पिछाडीवर असताना अधिक चांगली रणनीती वापरायला हवी होती. पुढच्या वेळी नक्कीच अधिक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेन.’
दुहेरी गटात चीनने आपले वर्चस्व अधोरेखित केले. महिला दुहेरीत लियू शेंगशु आणि टॅन निंग यांनी दक्षिण कोरियाच्या बाएक हा-ना आणि ली सो-ही यांना 21-18, 21-12 असे सरळ गेममध्ये हरवून किताब जिंकला.
मिश्र दुहेरीत फेंग यानझे आणि हुआंग डोंगपिंग यांनी आपल्या देशाच्याच जियांग झेनबांग आणि वेई याक्सिन यांच्यावर 21-19, 21-19 अशी मात करत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.





























































