
सध्या जगभरात युद्धाचा वणवा पेटला असून इस्रायल-इराण आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष कमालीचा टोकाला गेला आहे. या भीषण परिस्थितीमुळे बाबा वेंगा यांनी 2026 सालासाठी केलेली भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे चित्र निर्माण झाले असून सोशल मीडियावर बाबा वेंगांचे दावे मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत.
अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये संयुक्तपणे मोठे हवाई हल्ले केल्याचे वृत्त समोर आले असून, यामध्ये तेहरानमधील महत्त्वाच्या सरकारी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईचे समर्थन करताना म्हटले की, इराण सातत्याने आपल्या अणु आणि क्षेपणास्त्र क्षमतांचा विस्तार करत असल्याने ही मोठी लष्करी कारवाई करणे आवश्यक होते. इराणनेही याला चोख प्रत्युत्तर देत मध्य पूर्वेतील अनेक ठिकाणांवर हल्ले केले असून, यामुळे संपूर्ण प्रादेशिक भागात युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.
दुसरीकडे, शेजारील देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यात 70 जणांचा बळी गेल्यानंतर दोन्ही देशांमधील सीमाभागात संघर्ष पेटला. गुरुवारी रात्री तालिबानने पाकिस्तानवर हल्ला चढवला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून शुक्रवारी पहाटे पाकिस्तानने पुन्हा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केले. या भीषण युद्धात आतापर्यंत शेकडो सैनिकांचा आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तालिबानने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला असून, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दोन्ही देशांमध्ये अधिकृतपणे युद्ध सुरू झाल्याचे जाहीर केले आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांनी 2025 आणि 2026 सालासाठी केलेली भाकिते खरी ठरताना दिसत आहेत. त्यांनी 2025 मध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान, पाक-अफगाण आणि इस्रायल-इराण यांच्यात युद्धे होतील, असे भाकीत वर्तवले होते. याआधी सोव्हिएत युनियनचे पतन, 9/11 चा हल्ला आणि स्मार्टफोनचा उदय यांसारखी त्यांची अनेक भाकिते तंतोतंत खरी ठरली आहेत. आता 2026 मध्ये होणाऱ्या मोठ्या युद्धांच्या इशाऱ्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.
























































