
8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. जगभरातल्या महिलांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याच्या या दिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गुगलनेही एक विशिष्ट डुडल बनवून महिलांना मानवंदना दिली आहे.

या डुडलमध्ये आज अॅनिमेटेड व्हिडीओ देण्यात आला आहे. हा व्हिडीओ थ्री डी असून मल्टिलेअर्ड मॅन्डेला पद्धतीने बनवण्यात आला आहे. हे डुडल न्यू यॉर्क इथल्या गेस्ट आर्टिस्टने तयार केलं आहे. तर याचं अॅनिमेशन ज्युरिकच्या गेस्ट अॅनिमेटर्सनी तयार केलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत इसवी सन 1800 ते 1930 पर्यंत चाललेल्या कामगार हक्क चळवळीला दाखवण्यात आलं आहे. या डुडलच्या दुसऱ्या लेअरवर 1950 ते 1980 दरम्यानच्या महिला रेखाटण्यात आल्या आहेत. या तीस वर्षांमध्ये एका वेगळ्या पातळीवर महिला सशक्तिकरणाची सुरुवात झाली होती. त्यानंतर तिसऱ्या लेअरवर 1990 ते आजतागायत अशा महिलांच्या रुपाला रेखाटण्यात आलं आहे.
महिलांनी गेल्या काही काळापासून संघर्ष करणाऱ्या घटकांसोबत खांद्याला खांदा भिडवत संघर्ष केला आहे. त्यासाठी प्रसंगी बलिदानही दिलं आहे. आजच्या महिला अशाच प्रकारे महिला अधिकारांसाठीच्या आंदोलनांना पुढे नेत राहतील, असं मत गुगलतर्फे व्यक्त करण्यात आलं आहे.


























































