गंगा प्रदूषित करतेय जगभरातील समुद्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । स्विझरर्लंड

जगभरातील समुद्रात जमा होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याच्या प्रदूषणाला चीनची यांगत्जे नदी सर्वाधिक जबाबदार मानली गेली असून त्या खालोखाल हिंदुस्थानची गंगा नदी प्लॅस्टिक प्रदूषणात पुढे आहे. समुद्राला प्रदूषित करण्यासाठी जगातील १० नद्यांना सर्वात जास्त जबाबदार धरले आहे. या दहा नद्यांपैकी ८ नद्या आशियातील आहेत तर दोन नद्या या आफ्रिका खंडातील आहेत. समुद्रात जो कचरा जमा होतो त्यापैकी ९० टक्के कचरा या नद्यांतून येतो.

मोठ्य़ा नद्यांच्या दोन्ही किनाऱ्याला पसलेला कचरा बाहेर काढला जात नाही. त्यामुळे तो वाहत समुद्राला जाऊन मिळतो. छोटय़ा नदींच्या किनाऱ्याला जास्त कचरा नसल्यामुळे जास्त प्रदूषण होत नाही, असे संशोधक डॉ. ख्रिचियन स्किमीट यांनी म्हटले आहे.

चिनी नदी सगळ्य़ात प्रदूषणकारी

आशियातील सर्वात मोठी नदी असलेली चीनची यांग्त्जे नदी सगळय़ात जास्त प्लॅस्टिकचा कचरा समुद्रात टाकत असते. या नदीच्या परिसरात चीनचे ५० कोटी लोक राहतात. दरवर्षी तब्बल ८० लाख टन कचरा या नदीतून समुद्रात जात असतो. चीनमुळे समुद्राचे सर्वात जास्त प्रदूषण होते, असे संयुक्त राष्ट्रांचे पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख एरिक सोलहेम यांचे म्हणणे आहे.

‘नमामी गंगे प्रकल्प’ अपयशी

समुद्रातील प्लॅस्टिक प्रदूषणासाठी हिंदुस्थानची गंगा आणि सिंधू नदीला जबाबदार धरण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून गंगेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी मोदी सरकारने ‘नमामी गंगे प्रकल्प’ सुरू केला. मात्र, या प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे गंगेच्या पाण्याचा एक थेंबही स्वच्छ झालेला नाही, असे स्पष्ट करत राष्ट्रीय हरित लवादाने केंद्राला चांगलेच खडसावले आहे.

समुद्र प्रदूषित करणाऱ्या नद्या

नदी       –        देश
यांग्त्जे      –       चीन
गंगा        –      हिंदुस्थान
येलो       –       चीन
पर्ल        –        चीन
एमर       –        रशिया, चीन
सिंधू        –        हिंदुस्थान
मिकांग     –        चीन
है ही        –        चीन
नाईल       –      आफ्रिका
नाईजर      –       आफ्रिका