
एका क्लिकवर थ्रीडी नकाशे, चित्रांसह वॉर्डची डिजिटल माहिती देणारा मुंबईतील पहिलाच ‘थ्रीडी’ मॅपिंग उपक्रम पालिकेच्या जी/दक्षिण वॉर्ड वरळीत सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला 10 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे मुंबईचा ‘थ्रीडी’ मॅपिंग असणाऱया जागतिक शहरात समावेश झाला आहे.
मुंबईची वाढती लोकसंख्या व विस्तारणारा भौगोलिक परिसर यामुळे मुलभूत नागरी सेवासुविधा पुरवणे, पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, मोठे प्रकल्प राबविणे हे प्रशासकीयदृष्टय़ा आणि इतरही कारणांनीही मोठे आव्हान ठरते. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून बृहन्मुंबई महानगर क्षेत्राचा डिजिटल स्वरुपात त्रिमितीय नकाशा तयार करण्यासाठी म्हणजेच थ्रीडी मॅपिंग करण्याच्या सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केल्या आहेत. त्याची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात म्हणून वरळी परिसराचा सुमारे 10 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा त्रिमितीय नकाशा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि माहिती व तंत्रज्ञान संचालक शरद उघडे यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे. सदर डिजिटल थ्री डी तंत्रज्ञानविषयक कामकाजासाठी जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पेरेशन लिमिटेड यांचे सहकार्य मिळाले आहे.
असा आहे प्रकल्प
या प्रकल्पाबाबत विस्तृत माहिती देताना सहाय्यक आयुक्त शरद उघडे म्हणाले की, आधुनिक काळात फक्त कागदावरचे नकाशे पाहून प्रशासन करणे तुलनेने आत्यंतिक कठीण आहे. डिजिटल तंत्रज्ञान आणि त्याच्या आधुनिक साधनांचा उपयोग करुन बनविलेले नकाशे हे प्रशासन करताना कामकाजाचा दृष्टिकोनच आमूलाग्रपणे बदलून टाकतात. थ्री डी मॅपिंग अर्थात त्रिमितीय नकाशा पद्धतीने कोणत्याही परिसराचे आभासी परंतु हुबेहूब रूप पाहता येते. संपूर्ण 360 अंशातील अवलोकन करून, उंची-रुंदी, खोली, जाडी अशा सर्व पैलुंनी तो परिसर पाहता येतो. त्यामध्ये कोणताही बदल झाला तर लागलीच प्रत्यक्षात पडताळता येते व पुरावा म्हणून त्याचा उपयोगही करता येतो.
बेकायदा बदल समजणार, विकासासाठी उपयुक्त
जिओस्पेशियल मॉडेल हे नागरी प्रशासनासाठी महत्त्वाचे आहेत. फक्त प्रकल्पांची अंमलबजावणीच नाही, तर पायाभूत सेवासुविधांचे योग्य नियोजन करून त्यांचा दर्जा उंचावणे, नागरी सेवा-सुविधांचे मूल्यमापन करणे, आपत्ती व्यवस्थापन प्रभावीरीत्या करणे, वातावरण बदलांच्या प्रभावाचे विश्लेषण करणे, जनतेची सुरक्षितता अशा अनेक कामकाजांमध्ये थ्रीडी मॅपिंग तंत्रज्ञानाची मदत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या अधिकृत मॅपिंगमुळे बेकायदा बदल, बांधकामे यांचीही माहिती मिळणार आहे.


























































