
सामना प्रतिनिधी । मुंबई
श्री सिद्धिविनायक… श्री स्वामी समर्थ… इतर अनेक दैवतं. मंदिरं किंवा मठ इ. आध्यात्मिक स्थानी गर्दी तर नेहमीच असते. पण या गर्दीचा बहुसंख्येने चेहरा तरुणाईचा असतो. मंगळवार पहाटेपासूनच तरुणाई दूरवरच्या उपनगरातून अनवाणी दर्शनासाठी निघते. समर्थांचा मठ गुरुवारी पहाटेपासून रात्रीपर्यंत तरुणाईच्या सेवेने ओसंडून जातो. साईबाबांचा भंडारा तरुणाईच्या उत्साहातच दिवसभर साजरा होतो. जर तरुणाईचे दिवसच्या दिवस या कर्मकांडात जाऊ लागले तर अभ्यास कधी करायचा… छंद कधी जोपासायचे…
संजना धुरी-जाधव
अध्यात्म अन् अंधश्रद्धा फरक समजून घ्या
प्रत्येकाने आध्यात्मिक असले पाहिजे, परंतु अध्यात्म आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घ्यायला हवा. मंगळवारी, संकष्टी, अंगारिका या काळात माझे अनेक मित्र-मित्रिणी सिद्धिविनायकाला अनवाणी जातात. हा अट्टाहास कशासाठी? देवावर श्रद्धा असणे चुकीचे नाही, पण स्वतःला त्रास करुन तासनतास का चालायचे? मला वाटते देवाला नमस्कार करण्यासाठी देवळातच जायला हवे का… आपल्या घरातील देवाला मनापासून नमस्कार केला तरी तो पुरेसा आहे. आज अनेक गरजूंना मदतीची गरज असते. अशांना करा ना मदत… देवावर हजारो रुपये खर्च करणारे आपण गरजूंना एक रुपया देताना विचार करतो. आमच्या पिढीने देवाची भक्ती करायला हवी पण डोळे उघडे ठेऊ एवढेच माझे म्हणणे आहे.
जुवेता लाड, इस्माईल युसूफ
श्रद्धेबरोबरच आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा
माझा देवावर विश्वास आहे. मला वाटतं देवावर विश्वास असावा, पण त्याचा अतिरेक नसावा. आपण कितीही सुशिक्षित असलो तरी आजही अडचणींच्या वेळी देवाचा धावा करतो. सकाळी उठल्यावर, चांगल्या कामासाठी निघताना देवाला नमस्कार करुन घराबाहेर पडतो. कारण त्याच्यावर आपला विश्वास आहे. तो पाठीशी उभा राहील. पण श्रद्धेबरोबरच बुद्धिमत्तेवरही आपला विश्वास असायला हवा, नुसतं देव देव करून अभ्यासच केला नाही तर कुणी पास होणार का? प्रयत्नांची जोड हवीच ना… मी आध्यात्मिक आहे, पण अंधश्रद्धाळू नाही.
प्रतीक्षा सुर्वे, चेतना कॉलेज
माणसातले माणूसपण जपा, देव सापडेल
आमच्यासारख्या तरुण पिढीला अध्यात्माची ओळख व्हायला हवी. माझे मित्रमंडळी मंदिरात जातात त्यांच्यासोबत मीही जातो. पण आजकाल मंदिरात जाणं, अनवाणी जाणं, उपासतापास करणं हे जणू एक फॅडच झालं आहे. त्यामागच्या धार्मिक भावना कोणामध्ये दिसत नाहीत. ग्रुपने देवळात जायचे तिथे सेल्फी काढायचे, ते फेसबुक, इंस्टाग्रामवर अपलोड करायचे आणि आपण किती धार्मिक आहोत याचा बाऊ करायचा हेच दिसते. त्यातले कित्येकजण मनापासून हे सगळं करतात? करायचेच असेल तर अनेक सामाजिक संस्था उपक्रम करत असतात त्यात सहभागी व्हा… किल्ल्यांवरची साफसफाई म्हणा… गरजूंना मदत म्हणा करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्या करा, त्यात मनःशांती आहे. देवाने अनवाणी या, उपास करा असे काही सांगितले नाहीय. माणसातच देव आहे, त्याला जपा, तिथेच मनःशांती मिळेल. मित्र-मैत्रिणी करतात म्हणून आपण करायचे हे ठीक नाही.
आदित्य पावसकर, गव्हर्नमेण्ट पॉलिटेक्निक, मुंबई
आध्यात्मिक असावे, पण आहारी जाऊ नका
तरुणांनी किती आध्यात्मिक असावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. एकविसाव्या शतकात वावरणारी आताची तरुण पिढी कर्मकांड, देवभोळेपणा या गोष्टींवर जास्त विश्वास दाखवते ही खेदाची बाब आहे. माणसाने आध्यात्मिक असावे, पण त्याच्या आहारी जाता कामा नये. देवावर श्रद्धा असावी अंधश्रद्धा असू नये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही टक्के मुले आपल्यातल्या सुप्त गुणांचा शोध घ्यायचा सोडून विविध धार्मिक उत्सवामध्ये सहभागी होतात. त्यात गुंतून उत्सव समितीमध्ये अडकून स्वतःची कामे, जबाबदारी विसरून जातात. ‘हा मेसेज एकवीस लोकांना पाठवा नाहीतर पुढची दोन वर्ष तुमच्यासाठी काळ वाईट ठरेल’ असे बिनबुडाचे मेसेज पाठवतात. यावरूनच समजते की तरुण पिढीचा काही भाग हा आपल्यातील सद्सद्विवेकबुद्धीचा वापरच करत नाही, राहिला मुद्दा आध्यात्मिक असण्याचा तर सगळ्यात आधी आध्यात्मिक म्हणजे काय हे समजून घ्या, आध्यात्मिकतेच्या नावाखाली बरेच लोक आपले खिसे भरायला तयारच बसले आहेत. मला वाटते माणसाने आध्यात्मिक असावे, पण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते, याचाही विचार करावा.
दुर्गेश राऊळ, कीर्ती कॉलेज




























































