तालमीतच घेतला अखेरचा श्वास!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलातील कुस्तीपटू स्वप्नील पाडाळे याचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. पुण्यातील मारुंजी येथील तालमीत मुलांसोबत व्यायाम करत असताना सकाळी सहाच्या सुमारास हृदयविकाराचा झटका येऊन ही दुर्दैवी घटना घडली.  तो 28 वर्षांचा होता. रुग्णालयात नेण्यापूर्वीच स्वप्नीलचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील व एक छोटा भाऊ असा परिवार आहे.

स्वप्नीलला यास लहानपणापासून कुस्तीची आवड असल्याने तो कुस्तीची तयारी करून वेगवेगळ्या स्पर्धांत उतरत होता. महाराष्ट्र चॅम्पियनमध्ये तीन वेळा त्याने पदक प्राप्त केले असून, खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत ही दिखामदार कामगिरी करत पदक मिळवले होते. कात्रज येथील मोहोळ कुस्ती संकुलात नुकत्याच झालेल्या एनआयएस कुस्ती प्रशिक्षक परीक्षेत तो राज्यात प्रथम क्रमांकाने पास झाला होता. सध्या बालेवाडी येथे मुलांना प्रशिक्षण देण्याचे कामही तो करत होता. बुधवारी सकाळी जोर मारण्याचा व्यायाम करून बसल्यानंतर अचानक घाम येऊन तो बेशुद्ध पडला. त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच त्याचे निधन झाले.