‘बाई’पणाची लेखणी पेलणारं घर…

अनुराधा राजाध्यक्ष, anuradharajadhyakshya@gmail.com

ज्येष्ठ लेखिका ऊर्मिला पवार… उपेक्षा, अवहेलना यातून कणखर झालेल्या लेखणीची कथा…

बाईला स्वतःचं घरच नसतं. चातुर्वर्ण्य व्यवस्थेपासून बाईला समाजात स्वतःचं स्थानच नाही, अधिकार नाहीत. पुरुष देतील ते स्वीकारायचं, त्यात समाधान मानायचं. लग्नानंतर तर तिचं घर बदलतं, नाव बदलतं आणि ज्या घराला ती आपलं समजून जगायचा आटोकाट प्रयत्न करते ते घर तिला समजून घेतच नाही. ही फक्त अडाणी, अशिक्षित स्त्रियांचीच नाही तर सुशिक्षित, उच्चभ्रू स्त्रियांचीही अवस्था आहे. इतकंच कशाला, ते घर त्या स्त्रीच्या पैशांतून विकत घेतलेलं असलं आणि तिच्या नावावर असलं तरीही भांडणाच्या आणि बोलण्याच्या भरात ‘चालायला लाग माझ्या घरातून’ असं नवरा म्हणतो. ही अनाकलनीय वाटली तरी सत्य परिस्थिती आहे आणि या परिस्थितीला मी देखील अपवाद नाही. ‘आयदान, उदान, आम्हीही इतिहास घडवला, सहावं बोट, चौथी भिंत, हातचा एक’ अशा पुस्तकांतून समाजातल्या वास्तवतेकडे लेखणी रोखणाऱया ऊर्मिलाताई पवार त्यांच्या कांदिवलीच्या घरी त्यांना भेटायला गेले होते तेव्हा पोटतिडकीनं बोलत होत्या. कांदिवली पूर्वेला सहाव्या मजल्यावर ऊर्मिलाताई स्वतःच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये राहतात. त्यांच्या धाकटय़ा मुलीसह आणि नातीसह. त्यांच्या हॉलमध्ये एका भिंतीवर नातीनं काढलेल्या चित्रांसाठी खास जागा आहे. त्यांच्यासह फोटो काढताना, त्या चित्रांची रंगीबेरंगी बॅकग्राऊंड छान वाटत होती. त्या साध्याशा घरात त्यांनी माझं लाडू आणि चकल्या देऊन स्वागत केलं आणि नंतर गप्पांच्या ओघात जेवणाची वेळ टळून जाते आहे हे लक्षात आल्यावर आग्रहानं वांग्याचे काप आणि वरण-भात खाऊ घातला.

ऊर्मिलाताई सांगत होत्या, ‘मला जसजशी समज येत गेली, शिक्षणाचा माझ्यावर संस्कार झाला आणि मुंबईत गव्हर्नमेंट कॉलनीत साहित्य सहवासच्या जवळ राहायला आले तेव्हा एकंदरीतच आजूबाजूच्या वातावरणात बदल होऊन बाईची होणारी परवड मला जाणवत गेली.’ आयदानमधून ऊर्मिलाताईंनी ही मानसिकता व्यक्त केलेलीच आहे. त्यांच्या सजग लेखणीच्या सोबतीनं त्यांचा झालेला प्रवास जाणून घेताना त्या म्हणाल्या, ‘दलित समाजातल्या लोकांना गावात धड काम मिळत नसे म्हणून ते मिलिटरीत जायचे. माझे पणजोबा हेही असेच मिलिटरीत गेले. सत्यशोधक समाज, महात्मा फुलेंचे विचार यांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला. विचारप्रक्रियेत परिवर्तन यायला सुरुवात झाली. पूर्वापार परंपरांना प्रश्न विचारावेसे वाटायला लागले. म्हणूनच फणसावळे गावातल्या एका ब्राह्मणाला त्यांनी चॅलेंज दिलं. झालं होतं असं की, दलित समाजातली लग्नं लावायला जो ब्राह्मण यायचा तो दूरवरच्या एका झाडावर बसून मंत्र म्हणायचा. लग्नाची वेळ सकाळ किंवा संध्याकाळ. अस्पृश्यांची सावली अंगावर पडू नये म्हणून घेतलेली ही दक्षता. तो झाडावरून जोरात ‘सावधान’ ओरडला की एकमेकांना हार घालून वाद्यं वाजवली जायची आणि लग्न पार पडायचं. ही प्रथा पणजोबांना खटकली. ते म्हणाले की, हे मंत्र तर मलासुद्धा येतात. प्राणायाम येतो मग आमच्या समाजातले धार्मिक विधी मीच करत जाईन. एकमेकांना आव्हान देत दोघांनाही स्मशानात जमिनीखाली पुरलं गेलं. फक्त दूध देण्यापुरती जागा मोकळी ठेवली गेली. पाचव्या दिवशी ब्राह्मणाच्या जागेमधून दूध वर आलं आणि पणजोबा जिंकले. तेव्हापासून त्यांना ‘हरी मसणगिरी’ हे नाव पडलं. रूढींना जाब विचारत माणूस म्हणून आपल्याही अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडण्याचा वारसा ऊर्मिलाताईंकडे कुठून आला या माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं.

त्यांचे आजोबा चिमाजी भटगिरीच करायचे. ऊर्मिलाताईंच्या वडिलांना त्यांनी रत्नागिरीच्या मिशनरी शाळेत शिकवलं. तिथल्या मडमेनं वडिलांना परदेशात शिक्षणासाठी नेण्याचीसुद्धा तयारी दर्शवली होती, परंतु ‘परदेशी गेलेला मनुष्य परत येत नाही, त्याचा मृत्यू होतो’ वगैरे विचारांचा इतका पगडा होता तेव्हा की ती योजना बारगळली. ऊर्मिलाताई म्हणाल्या, ‘ती संधी जर स्वीकारली गेली असती तर आम्हा सगळ्यांचीच आयुष्ये निश्चितच वेगळ्या मार्गानं गेली असती याची आज खंत वाटते. वडील सहावीपर्यंत शिकले, शिक्षक झाले. नंतर सातवी पास केली त्यांनी. अतिशय कष्टाळू होते ते. शिक्षणाचं महत्त्व त्यांना ठाऊक होतं. या खेडय़ात आपल्या मुलांचं भवितव्य नाही हे ओळखून रत्नागिरीला शिक्षण द्यावं असं त्यांना वाटलं म्हणून गाव सोडून आम्ही रत्नागिरीला आलो. तिथे रस्त्यावर झोपडी बांधून राहिलो. आजूबाजूला उच्चवर्णीयांची वस्ती होती. मी तिसरीत असताना वडील वारले आणि आम्हा सगळ्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी आईवर येऊन पडली. बांबूच्या पट्टय़ांचा आयदान ती बनवायची, विकायची. पैसा कनवटीला बांधून काटकसरीनं घर चालवायची. सतत कामात असायची ती. प्रेमस्वरूप आई वगैरे चित्र नाहीये माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आईचं. परिस्थितीनं गांजलेली, त्रासलेली पाहिली आहे मी तिला. ती आजारी पडली तर तिच्या तोंडाला चव यावी जेवताना म्हणून शेजारीच राहणाऱया एका ब्राह्मण कुटुंबाकडे मी जायचे. ते कुटुंब लोणचं विकायचं. त्यांच्या अंगणातल्या वाळवणावर आपली सावली पडू न देता मी लांबूनच ‘लोणचं द्या हो’ अशा हाका मारत उभी राहिल्यानंतर एका पायरीवर केळीच्या पानात लोणचं ठेवलं जायचं. मग मी ते उचलायचे आणि दोन पैसे खालच्या पायरीवर ठेवायचे. त्यावर पाणी टाकून पैसे उचलले जायचे. एवढय़ा वेळात माझी आई जेवणासाठी कासावीस झालेली असायची. आईनं वडिलांना मरताना वचन दिलेलं होतं, मुलांना शिकवेन म्हणून आणि ती ते वचन दिवसरात्र कष्ट करून निभवत होती.

कॉलेजचं शिक्षण अर्धवट असतानाच त्यांचा प्रेमविवाह झाला. रत्नागिरीतच दोघंही नोकरी करत होते. ऊर्मिलाताई त्यावेळच्या जातीभेदावर प्रकाश टाकताना म्हणाल्या, ‘एकच खोली होती आमची. छोटीशी. मुलं झाल्यावर त्या खोलीत इतकी गर्दी झाली होती की एकमेकांचे पायही आम्हाला दिसत नसत. मग मोठं घर शोधायचा प्रयत्न केला पण जातीमुळे ते मिळणं खूप अवघड गेलं . एका माळ्यानं दोन खोल्या दिल्या आणि मग कपडे बदलताना पडदा बांधण्याची गरज भासेनाशी झाली. कारण तिकडे भिंत होती. त्या घरात हळूहळू वाचनाला सुरुवात झाली. नंतर मुंबईला आलो.. गव्हर्नमेंट कॉलनीत तीन खोल्यांची जागा मिळाली आणि एकमेकांचे पाय दिसण्याइतपत वावरायला मोकळीक मिळाली.’

ऊर्मिलाताई हे सगळं जरी सहजतेनं आणि हसत सांगत होत्या तरी त्यामागचा त्यांना जाणवलेला उपेक्षेचा डंख माझ्याही नजरेतून सुटला नाही. त्यांच्या लेखणीला जे खाद्य मिळालं ते त्यांच्या आयुष्यात घडणाऱया घटनांना त्यांनी डोळसपणे पाहिल्यामुळेच. गावातल्या बायका काम करताना, न संपणारी वाट चालताना आपल्या सुखदुःखाची देवाणघेवाण करायच्या. मन मोकळं करण्याचा हेतू तर त्यात असायचाच पण त्या बोलण्याच्या भरात कष्टाचा आणि तंगडतोडीचा त्रास जाणवूच नये हा मुख्य हेतू असायचा. त्या बायकांच्या गोष्टीवेल्हाळपणाचा नकळत संस्कार ऊर्मिलाताईंवर झाला. शिवाय नोकरी करत असताना डबा खाता खाता सहकारी स्त्रियांच्या एखाद्या व्यथेला वाचा फुटायची आणि ऊर्मिलाताईंना त्यावर कथा लिहावीशी वाटायची. यातूनच लिखाणाला सुरुवात झाली. विचारांचं आदानप्रदान व्हायला लागली. परंपरेला प्रश्न विचारण्याचं धाडस आलं. काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याचं मंथन करण्याची क्षमता आली. दरम्यान नोकरी सांभाळून सिद्धार्थ कॉलेजमधून त्यांनी एम. ए.सुद्धा केलं. अनुभवांनी परिपक्व झालेल्या ऊर्मिलाताईंच्या लिखाणाला सच्चेपणाचा गंध आहे.

यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, ‘‘डोळ्यांनी नाही तर मनानं बघण्याची दृष्टी बाबासाहेबांमुळे मला मिळाली. म्हणूनच परिस्थितीला नाइलाजानं स्वीकारणाऱया स्त्रियांचं आणि दलितांचं आयुष्य जसंच्या तसं रेखाटण्याची हिंमत मी करू शकले. माझ्या कवच या कथेच्या बाबतीतला किस्सा मी नक्कीच सांगू इच्छिते. ही कथा अभ्यासक्रमात आहे. या कथेत आंबे विकणाऱया स्त्रियांना ग्राहकांकडून द्वयर्थी शब्दप्रयोग ऐकून घ्यावे लागतात. पण वास्तवाचं चित्रण करताना होणाऱया अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्याचा तो प्रामाणिक हेतू होता हे विद्यार्थिनींनाच जाणवलं. काही पत्रकारांनीही या निखळ हेतूचा पुरस्कार केला आणि मग ते प्रकरण मिटलं. मात्र ऊर्मिलाताईंनी हेही सांगितलं की, ‘घरामध्ये लिहिताना सर्व जण झोपल्यानंतर किचनमध्ये लाइट लावून मला लिहावं लागायचं. कारण माझ्या लिहिण्याचा आणि लाइटचा इतरांना त्रास होऊ नये याची दक्षता मला घ्यावी लागायची.

बाई जेव्हा लिहिते तेव्हा ‘आधी कूकर लाव आणि मग लिही’ असं नवरा म्हणतो, पण पुरुष लेखक असला तर त्याचं कौतुक मात्र त्याची बायको सगळीकडे करते. ही तफावत त्यांनी खंत स्वरूपात व्यक्त केली, ‘ बाई हेच एक घर आहे. तिचे चिरे, पायऱया तुटतात पण ते घर क्षमाशील असतं आणि ते प्रत्येकाला आसरा देत ठामपणे उभं असतं’ हे ऊर्मिलाताईंचं म्हणणं. प्रखर आत्मभान असणाऱया आणि अडथळ्यांची शर्यत पार करणारच या आत्मविश्वासानं, निडरपणे आपल्या लिखाणातून व्यकत होणाऱया ७३ वर्षांच्या ऊर्मिलाताईंची भेट विलक्षणच होती. कारण ‘मी स्त्री आहे म्हणून एखादी गोष्ट करू शकत नाही’ या स्त्राीच्याच मनातल्या शृंखला तोडण्याची ताकद त्यांच्या शब्दांत आणि कृतीत ठासून भरलेली होती..