
अहमदाबाद विमान अपघातानंतर ब्रिटनमधील कुटुंबियांना चुकीचे मृतदेह पाठवण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. तसा आरोप लंडनमधील पीडितांच्या कुटुंबियांनी केला आहे.
12 जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग विमान अहमदाबादवरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एका इमारतीवर कोसळले. या भीषण दुर्घटनेत 260 लोकांचा मृत्यू झाला, ज्यात विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा समावेश होता. मृतांमध्ये 169 हिंदुस्थानी, 53 ब्रिटिश, 1 कॅनडा आणि पोर्तुगालचे 7 नागरिक होते. विमान कोसळ्यानंतर मोठय़ा प्रमाणात इंधनाने पेट घेतल्यामुळे प्रवाशांचा जागीच कोळसा झाला. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आले होते. मात्र आता ब्रिटनमधील दोन पीडितांच्या कुटुंबियांनी चुकीचे मृतदेह पाठवण्यात आल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबियांनी अंत्यसंस्कार थांबवले आणि चौकशीची मागणी केली.
अनेकांनी आधीच केले अंत्यसंस्कार
इनर वेस्ट लंडनच्या कोरोनर डॉ. फियोना विल्कॉक्स यांनी डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही चूक उघडकीस आली. अपघातानंतर, ब्रिटिश नागरिकांचे कुटुंबिय हिंदुस्थानात आले होते आणि त्यांनी मृतदेह मिळविण्यासाठी डीएनएचे नमुने दिले. त्यानंतर, हिंदुस्थानात डीएनए चाचणी केल्यानंतर मृतदेह ब्रिटिश कुटुंबांना सोपवण्यात आले. मात्र लंडनमध्ये पुन्हा एकदा डीएनए चाचणी केल्यानंतर चूक लक्षात आली. या प्रकारामुळे इतर मृतदेहांची ओळख पटवण्यात चुका झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बहुतेक मृतदेहांवर त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले आहेत.