WWC- दीपक पुनियाची अंतिम फेरीतून माघार

375

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतून हिंदुस्थानी कुस्तीपटू दीपक पुनिया याने माघार घेतली आहे. त्यामुळे तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे. तर त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या इराणच्या हसन याजगानिचाराटी याला सुवर्णपदक मिळालं आहे. हिंदुस्थानला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं असलं तरी दीपकने हिंदुस्थानला टोकियो ऑलिम्पिकसाठी कुस्तीतील चौथा कोटा मिळवून दिला आहे.

दीपक पुनियाने शनिवारी 86 किलो गटाच्या उपांत्य लढतीत स्वित्झर्लंडच्या स्टीफन रिचमुथचा 8-2 गुणफरकाने सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली. याचबरोबर त्याने 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचा कोटाही देशाला मिळवून दिला. चुरशीच्या या उपांत्यपूर्व लढतीत दीपकने कोलंबियाच्या कार्लोस मेंडेजवर 7-6 असा एका गुणांनी विजय मिळवला होता.

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या दीपक पुनियाला सुशीलकुमारची बरोबरी करण्याची संधी मिळाली होती. दीपकने हसनला हरवले असते तर या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा हिंदुस्थानी कुस्तीपटू ठरला असता. दोन वेळच्या ऑलिम्पिकपदक विजेत्या सुशीलकुमारने 2010 मध्ये मॉस्कोतील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला होता.

आपली प्रतिक्रिया द्या