
सामना ऑनलाईन । मुंबई
देशात महागाई दिवसेंदिवस वाढत असून जीवनावश्यक वस्तूंपासून पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांना जगणे मुश्कील होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुसर्या महायुद्धात भाग घेतलेल्या राज्यातील माजी सैनिकांना व सैनिकांच्या विधवांना चांगली बातमी दिली आहे. यापुढे माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींना सहा हजार रुपये मासिक निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. दुसर्या महायुद्धात भाग घेतलेल्या राज्यातील माजी सैनिकांना व सैनिकांच्या विधवा पत्नींना 1 ऑक्टोबर 1989 पासून मासिक निवृत्तीवेतन देण्यात येत आहे. त्यावेळी तीनशे रुपये मासिक निवृत्तीवेतन दिले जात होते. वेळोवेळी या रकमेत वाढ करण्यात आली. 1 मे 2011 पासून तीन हजार रुपये मासिक निवृत्तीवेतन देण्यास सुरुवात झाली. आता यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे. अनेक माजी सैनिकांना, विधवा पत्नींना दिलासा मिळेल.



























































