जगभरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ सेवा विस्कळीत; कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) बुधवारी रात्री अचानक डाऊन झाल्याने जगभरातील कोट्यवधी युजर्सना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. हिंदुस्थान, अमेरिका आणि युनायटेड किंगडमसह अनेक देशांतील युजर्सना त्यांचे फीड रिफ्रेश करण्यात आणि नवीन पोस्ट पाहण्यात अडथळे येत होते.

रात्री साधारण ८:१५ वाजल्यापासून या तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली. आऊटेज ट्रॅक करणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरवर अल्पावधीतच हजारो तक्रारींची नोंद झाली. हिंदुस्थानात मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांमधून युजर्सनी सेवा विस्कळीत झाल्याचे सांगितले. मोबाईल ॲप्लिकेशन वापरणाऱ्या अनेक युजर्सना सध्या पोस्ट मिळवता येत नाहीत, कृपया पुन्हा प्रयत्न करा, असा संदेश दिसत होता, तर डेस्कटॉपवर वापरकर्त्यांना रिकामी टाईमलाईन किंवा एरर मेसेज येत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत ३६,००० पेक्षा जास्त तर हिंदुस्थानात ४,७०० हून अधिक युजर्सनी डाउनडिटेक्टरवर या संदर्भात तक्रारी नोंदवल्या होत्या. या तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. साधारण एक तासाच्या व्यत्ययानंतर काही भागांत सेवा हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. मात्र या संदर्भात ‘X’ कडून किंवा इलॉन मस्क यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.