राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘वाय’ ठरला सर्वोत्कृष्ट!

57 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘वाय’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. याच चित्रपटासाठी अजित वाडीकर उत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. ‘बाबा’ या चित्रपटासाठी दीपक डोब्रियाल सर्वोत्कृष्ट अभिनेते तर ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटासाठी मृण्मयी देशपांडे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

‘आनंदी गोपाळ’ हा सामाजिक विषय हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. तर याच चित्रपटासाठी समीर विध्वंस यांना सामाजिक प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले. ‘ताजमाल’ हा ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर याच चित्रपटासाठी नियाज मुजावर यांना ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले.
आणि विजेते आहेत…

सर्वोत्कृष्ट कथा – बा. भ. बोरकर (पांघरूण), पटकथा – विक्रम फडणीस (स्माईल प्लिज), संवाद – इरावती कर्णिक (आनंदी गोपाळ), गीत – संजय कृष्णाजी पाटील (हिरकणी), संगीत – अमित राज (हिरकणी), विनोदी अभिनेता – पार्थ भालेराव (बस्ता), सहाय्यक अभिनेता – रोहित फाळके (पांघरूण), सहाय्यक अभिनेत्री – नंदिता पाटकर (बाबा).

सोहळय़ात ‘राज कपूर जीवनगौरव पुरस्कारा’ने ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी (2020), ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (2021) आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेलन (2022) यांना गौरविण्यात आले, तर ‘राज कपूर विशेष योगदान पुरस्कारा’ने ज्येष्ठ दिग्दर्शक जे. पी. दत्ता (2020), गायक सोनू निगम (2021) आणि निर्माते-दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (2022) यांना गौरविण्यात आले.

 ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ 2020 या वर्षासाठी अभिनेते रवींद्र महाजनी (मरणोत्तर), ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण (2021) आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक (2022) यांना प्रदान करण्यात आला. यासोबतच ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारा’ने दिग्दर्शक गजेंद्र अहिरे (2020), ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे (2021) आणि अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे (2022) यांना गौरविण्यात आले.