वेब न्यूज : याहू ‘मेलच्या माजी इंजिनीअरवर आरोप दाखल

485

 यावर्षीच्या सुरुवातीलाच गुगल आणि ऍपलसारख्या कंपन्या इंटरनेट कॉल्स आणि आपल्या सिरीसारख्या आर्टिफिशल इंटेलिजन्सने युक्त अशा असिस्टंटच्या माध्यमातून ग्राहकांवर आणि त्यांची वैयक्तिक माहिती, संभाषणावर लक्ष ठेवून असल्याचे सिद्ध झाले होते. गेल्याच महिन्यात मायक्रोसॉफ्टदेखील स्काईपच्या माध्यमातून ग्राहकांच्या संभाषणांची हेरगिरी करत असल्याचे जोरदार आरोप करण्यात आले होते आणि त्याबद्दल खटलादेखील भरण्यात आला आहे. या सगळ्या वादळात मोठमोठय़ा तंत्रज्ञान कंपन्यांची विश्वासार्हता धोक्यात आलेली असतानाच आता याहूसारख्या दिग्गज कंपनीच्या माजी इंजिनीअरला तब्बल 6000 याहू अकाऊंटस् हॅक करण्याच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले आहे. रेज रुझ असे त्याचे नाव आहे. एफबीआय संस्थेने केलेल्या चौकशी सत्रात ही बाब उघड झाली आहे. या 6000 हॅक करण्यात आलेल्या खात्यांमध्ये बरीचशी खाती ही रेजच्या सरकारी कर्मचारी महिलांची आणि ओळखीतल्या स्त्रियांची असल्याची धक्कादायक माहितीदेखील समोर आली आहे. या इंजिनीअरने याहूच्या खात्याबरोबरच सदर पीडितांची iCloud, Facebook, Dropbox आणि Gmail खातीदेखील हॅक केल्याची कबुली दिली आहे. या महिलांची नग्न छायाचित्रे, अशील व्हिडीओच्या शोधात या आरोपीने हे नीच कृत्य केल्याचे उघड झाले आहे. या पीडितांमध्ये तरुणींची संख्या लक्षणीय आहे. या महाभाग इंजिनीअरने दहा वर्षे याहूत नोकरी केली आहे. त्यानंतर साधारण 2018 च्या सुमारास त्याने कंपनी सोडली. मात्र आपल्या नोकरीच्या काळात याहूच्या मेल सर्व्हिसेसमध्ये ‘Reliability engineer’ पदावर कार्यरत असताना त्याने कोणत्याही परवानगीशिवाय ग्राहकांची अश्लील छायाचित्रे, व्हिडीओ कॉपी करून घेतले आणि हा सगळा डाटा आपल्या घरात साठवून ठेवला होता. या इंजिनीअरला कारावास आणि सुमारे 250000 डॉलर्सच्या आसपास दंड अशी दुहेरी शिक्षा होण्याची शक्यता आहे. याहूने मात्र अजूनही या सर्व घटनेवर कोणतीही टिपणी दिलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या