यारी रोडच्या दीडशे बेघरांना न्याय मिळवण्यासाठी 500 विद्यार्थी रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
yari-road-stdents-protest

सामना प्रतिनिधी । मुंबई

महापालिका आणि उपनगर जिल्हाधिकारी यांनी वर्सोवा-यारी रोडमधल्या कवठय़ा खाडीतील गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ राहणाऱया सुमारे 150 झोपडय़ा जमीनदोस्त केल्या. कोणतीही नोटीस न देता आणि पर्यायी राहण्याची व्यवस्था न करता या झोपडय़ा जमीनदोस्त केल्याने झोपडीधारक आपल्या कुटुंबासह सध्याच्या कडाक्याच्या थंडीत अन्न, वस्त्र, निवाऱयाशिवाय गेला आठवडाभर राहात आहेत. यारी रोडच्या या दीडशे बेघरांना न्याय मिळण्यासाठी येथील शाळांमधील 500हून अधिक विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या बेघरांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यारी रोडवरील या झोपडीतील आणि चिल्ड्रन वेल्फेअर शाळेत शिकणारी तीन वर्षांची प्ले ग्रुपची आफ्रीन मुजावर ही विद्यार्थिनी आईसह प्राचार्य अजय कौल यांना भेटल्या. आमच्या झोपडय़ा तोडल्याने मी गेले तीन दिवस उपाशी आहे. आम्हाला मदत करा, अशी विनवणी तिने केली. त्यानंतर प्राचार्य कौल यांनी येथील बेघरांना न्याय मिळवून देण्यासाठी येथील सुमारे 500 नागरिकांसह आणि विद्यार्थ्यांसह त्यांच्या मागे देवदूतासारखे उभे राहिले. तसेच या कुटुंबीयांसाठी अन्न, पाणी व शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. याबाबत प्राचार्य अजय कौल म्हणाले, विकासाच्या आड येणाऱया झोपडय़ा तोडण्याच्या विरोधात मी कदापी नाही. मात्र त्यांना बेघर करण्यापूर्वी त्यांच्या निवाऱयाची पर्यायी व्यवस्था प्रशासनाने करायला हवी होती. या झोपडपट्टीधारकांना पाठिंबा देण्यासाठी यारी रोड येथील सर्व जातीचे नागरिक रस्त्यावर उतरले. या वेळी माजी अतिरिक्त पोलीस आयुक्त ए.ए. खान, शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे, शाखाप्रमुख सुधाकर अहिरे, गटप्रमुख सतीश परब, राजेश रासम, उपशाखाप्रमुख तारीक पटेल, नगरसेविका मेहेर मोहसीन हैदर, माजी नगरसेवक मोहसीन हैदर, याकूब मेमन उपस्थित होते. येथील झोपडय़ा तोडल्यापासून नगरसेविका खोपडे यांनी या बेघरांच्या अन्नाची व्यवस्था केल्याची माहिती उपविभागप्रमुख राजेश शेटये यांनी दिली.

ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे नुकसान

येथील झोपडय़ांमध्ये राहणारे बहुसंख्य विद्यार्थी हे भवन्स कॉलेज, वेसावा विद्यामंदिर व अन्य ठिकाणी शिक्षण घेत आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा ऐन तोंडावर आल्या असताना निर्दयीपणे पालिका व पोलीस आमच्या वह्या, पुस्तकेसुद्धा घेऊन गेले. आम्ही आता अभ्यास कसा करायचा, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उपस्थित केला आहे. आज सायंकाळी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्राचार्य कौल यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली.