
जम्मू-कश्मीरमध्ये श्रीनगर येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले यश देशमुख यांच्यावर शनिवारी पिंपळगाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान भाऊ पंकज याने चितेला भडाग्नी दिला. यावेळी ‘शहीद यश देशमुख अमर रहे’ च्या घोषणांनी आसमंत निनादून गेला होता.
26 नोव्हेंबर रोजी श्रीनगर येथे एचएमटी परिसरात लष्कराच्या पथकावर अतिरेक्यांनी हल्ला केला. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात यश दिगंबरराव देशमुख यांना वीरमरण आले. आज यश यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी पिंपळगाव येथे आणण्यात आले. पोलीस दल, लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यात आल्यानंतर पार्थिवास पंकज देशमुख याने भडाग्नी दिला. यश देशमुख यांच्या पश्चात वडील दिगंबर, आई सुरेखा, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे.
यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करताना शहीद यश देशमुख यांच्या पुटुंबास एक कोटी रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले.




























































