मतांच्या राजकारणापोटी फडणवीसांना राज्याचे वातावरण बिघडवायचेय; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा फडणवीसांवर पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नेते आहेत, मात्र त्यांना मतांच्या राजकारणापोटी राज्याचे वातावरण बिघडवायचे आहे, असे दिसतेय. अमरावतीची जनता अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही. 12 आणि 13 तारखेला अमरावतीत जे घडले तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता, आता याचे राजकारण करून कोणी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, असा पलटवार पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

फडणवीसांच्या आरोपांना यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यशोमती ठापूर म्हणाल्या, अमरावती येथील वातावरण बिघडवण्याचा भाजपने प्रयत्न करू नये. 12 आणि 13 तारखेला घडलेल्या दोन्ही घटना तितक्याच दुर्दैवी आणि निंदनीय आहेत. दोन्ही घटनांमध्ये सामील असलेल्यांवर कारवाई सुरू आहे. इतकेच नव्हे, तर या घटनांचा वापर करून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱया सायबर गुन्हेगारांचाही विशेष पथकामार्फत तपास सुरू आहे.

शांत शहर अशांत केल्याप्रकरणी राज्याची माफी मागावी

आज देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौरा करून तिथले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. अमरावतीने नेहमीच सर्वांचे स्वागत केले आहे, पण अमरावतीत येऊन त्यांनी शांततेचे आवाहन केले असते तर बरे झाले असते, मात्र त्यांनी या घटनेचे राजकारणच करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 13 तारखेची घटना चुकीची आहे हे मान्य केलंय, मात्र याची जबाबदारी घेऊन एक शांत शहर अशांत केल्याप्रकरणी राज्याची माफीही त्यांनी मागितली पाहिजे, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.