
गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिर अखेर आज सुरू झाले. दिग्दर्शक विजय पेंकरे, चंद्रकांत कुलकर्णी यांनी तिसरी घंटा वाजवून नाटय़गृह सुरू झाल्याची नांदी दिली.
यशवंतराव चव्हाण नाटय़ संकुल पुन्हा सुरू व्हावे, अशी मागणी अनेक रसिकांची होती. नाटय़ परिषदेचे नवनिर्वाचित नियामक मंडळ व कार्यकारी समितीने अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण नाटय़ संकुल दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नूतनीकरण झालेल्या नाटय़ संकुलाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी गो. ब. देवल पुरस्काराचे वितरण झाले. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ झाडीपट्टी कलावंत परशुराम खुणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कणकवलीचे ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित यांच्या ‘रंगवाचा’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.
30 मे रोजी नाटय़गृहाचे काम सुरू केले. युद्धपातळीवर काम पूर्ण करून 14 जूनची तारीख गाठली. आज आनंदाने आणि अभिमानाने इथे आम्ही उभे आहोत. येत्या काळात उत्तम कलावंत आणि तंत्रज्ञ तयार करण्यासाठी नाटय़ परिषद काम करेल. पाच वर्षांचा अजेंडा तयार असून आमची टीम त्यासाठी एकत्रितपणे काम करेल.
प्रशांत दामले, अध्यक्ष नाटय़ परिषद





























































