बैलपोळ्यात बैलांच्या माथ्यावर बाशिंगा ऐवजी चक्क आरक्षणाची मागणीचे फलक!

>> प्रसाद नायगावकर

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. आरक्षणासाठी संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे. शेतीनिष्ठ असलेला मराठा बांधव आरक्षणाची मागणी रेटून धरत आहे. यवतमाळच्या दिग्रस येथे बैलपोळ्यात बैलांच्या माथ्यावर बाशिंगा ऐवजी आरक्षणाची मागणीचे फलक पाहायला मिळाले.

दरवर्षी पोळ्यानिमित्त बैल सजवून तोरणाखाली उभे केले जातात. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसच्या देवनगर भागातील वैभव राजाराम चव्हाण यांनी आपली बैलजोडी येथील शंकर टॉकिज परिसरात भरलेल्या पोळ्यात आणली. दरवर्षीप्रमाणे साज चढवलेल्या बैलांच्या शिंगावार बाशिंग नव्हे तर यावर्षी ‘जोपर्यंत आरक्षण नाही, तोपर्यंत मतदान नाही. एक मराठा लाख मराठा’ असा मजकूर लिहिलेले फलक लावले होते तर पाठीवरच्या झुलीवर “पोळा रे पोळा 3 बैलांचा पोळा ते झाले गोळा, मराठा आरक्षणाच्या उपोषणामुळे त्यांच्या पोटात उठला गोळा” असे लिहून शेतकऱ्याने मिंधे सरकारवर टीका केली. आरक्षणाची तीव्रता सांगणारे हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.