
सामना ऑनलाईन । नागपूर
सततची नापिकी, कर्जाचा वाढत जाणारा डोंगर यामुळे रोजची खाण्याचीच मारामार. त्यातच उसनवार करून मुलीचे लग्न केले. ऐपतीप्रमाणे कन्यादान करून दिले. सत्यनारायण झाला, मांडव परतणी झाली… कर्ज कसे फेडायचे या चिंतेत शेतकरी पित्याने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. काळीज गलबलून टाकणारी ही घटना यवतमाळ जिल्हय़ात घडली.
यवतमाळ हा देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पॅकेज, कर्जमाफीसारखे उपाय करूनही विदर्भाच्या या जिल्हय़ातील शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत. सातत्याने पडणारा दुष्काळ, पाण्याचा अभाव आणि कर्जाचे वाढणारे ओझे याखाली दबलेला शेतकरी जगणे नको म्हणून मरण जवळ करत आहे. जून 2014 ते 31 मार्च 2019 या कालावधीत विदर्भातील सहा जिल्हय़ांत 5,687 शेतकऱयांनी आत्महत्या केली.

























































