
मध्य प्रदेशातील खांडवा व हरदास येथील मंडळी मुलगी पाहण्याकरिता तवेरा या वाहनाने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे येत होते. मात्र पुसदपासून 7 किमी अंतरावर असलेल्या खंडाळा घाटात तवेराचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अशोक खोंदरे, अनंत पाटील व अरविंद खादे अशी मृतांची नावे आहेत. तर राम शंकर खादे व शेरसिंग राजपूत हे जखमी झाले आहेत. अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच खंडाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल चावडीकर तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार मोतीराम बोडके हे घटनास्थळी तात्काळ हजर झाले. जखमींना त्वरित पुसद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतकांना शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले आहे.



























































