यवतमाळ – सलग दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हादरला, नद्यांना पूर आल्याने वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद नायगांवकर, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्याला गेले दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. पुसद आणि उमरखेड तालुके हे या अवकाळी पावसामुळे सर्वाधिक प्रभावित तालुके आहेत. पुसद जिल्ह्यात कापूस, तूर आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इथल्या पार्डीमध्ये नदीनाल्यांना पूर आला आहे. ज्यामुळे पार्डीचा मुख्य रस्ता आज सकाळी 2 तास बंद होता. पुसद-उमरखेड रोडवरील शेलू गावाजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तीन नंबर शादी खान ,पार्वती नगर, आमराई येथे अनेकांचे घरात पाणी शिरले आहे तर रेस्ट हाऊस- वाशिम रोडवरील पुल हा पाण्याखाली गेला आहे.

अवकाळी पावसाने खरिपातील हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे . या पावसाने तुरी आणि कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान केले आहे. पावसामुळे कापसाची प्रत घसरल्याने हा कापूस कोणत्या भावाने विकला जाईल ही चिंता शेतकऱ्याला सतावत आहे. भाजीपाल्यासोबत फळबागांचेही पावसाने नुकसान केले आहे. खरीपासोबतच रब्बीच्या पिकांनाही या पावसामुळे धोका निर्माण झाला आहे.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि शेतकऱ्यांच्या प्रति सरकारच्या उदासीनतेमुळे यवतमाळ जिल्ह्यात केवळ 14 हजार शेतकऱयांनी रब्बी पिकांसाठी पीक विमा काढला आहे . सरकारने खंबीरतेने या संकटाच्या घडीला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या संजय ठाकरे यांनी केली आहे. असे झाले नाही तर मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.