दोन दिवस मुसळधार पावसाचे; मुंबईला ‘यलो अ‍ॅलर्ट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन डिसेंबरच्या सुरुवातीला मुंबई आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने आज हजेरी लावली. सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांची या पावसामुळे धांदल उडाली. बंद करून ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट पुन्हा बाहेर काढावे लागले. मुंबईसह कोकण, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात 3 डिसेंबरपर्यंत सोसाटय़ाच्या वाऱयासह हा पाऊस राहणार असून हवामान खात्याने मुंबई, ठाण्याला ‘यलो ऍलर्ट’ जारी केला आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिह्यांमध्ये ‘ऑरेंज ऍलर्ट’ देण्यात आला आहे.

मुंबईसह शेजारच्या नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिह्यांमध्ये अवकाळी पाऊस होत आहे. पुढील 48 तासांत 70 ते 120 मि.मी. पाऊस होण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याने वर्तवली आहे. आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत राहील असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दिशेने निघालेले चक्रीवादळ वायव्येला सरकल्याने अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्विपमधील हवामान बदलले आहे. तिथे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पाऊस होत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार वाऱयासह पाऊस होईल. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे, अशी माहिती हवामान विभागातील ज्येष्ठ हवामानतज्ञ के. एस. होशाळीकर यांनी दिली. उत्तर महाराष्ट्रात वाऱयाचा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र, गोवा येथील किनारपट्टीवर वादळी हवामान निर्माण होऊन ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

‘जवाद’ चक्रीवादळ 4 डिसेंबरला धडकणार

आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्रकिनाऱयावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ती 3 डिसेंबरपर्यंत आणखी तीव्र होऊन त्याचे रूपांतर ‘जवाद’ चक्रीवादळात होईल. ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकत जाऊन 4 डिसेंबरला आंध्र प्रदेश आणि ओडिशावर धडकेल असे हवामान खात्याने म्हटले आहे.

 मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

येत्या 24 तासांत राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अरबी समुद्रात वेगवान वारे सुटले असून त्यांचा वेग सतत वाढत असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.