
दादरच्या शिवतीर्थावर लाखोंच्या संख्येने हजर राहिलेल्या शिवसैनिक आणि मनसैनिकांनी महापालिकेवर ‘शिवशक्ती’चा भगवा फडकवून मुंबईला वाचवण्याचा निर्धार बोलून दाखवला. महाराष्ट्रद्रोह्यांचा मुंबई गिळण्याचा डाव काहीही करून उधळून लावणार, असा दृढनिश्चय करीत ‘मुंबई आमच्या हक्काची!’, ‘मुंबईवर वाकडी नजर टाकणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना गाडून टाकू’ अशा गगनभेदी घोषणा अतिविराट जनसमुदायातून देण्यात आल्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले ही मुंबई व महाराष्ट्रासाठी संस्मरणीय गोष्ट आहे. मुंबईत मराठी माणसाला ताठ मानेने राहण्यासाठी, मराठी माणसांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी पालिकेत शिवसेना आणि ठाकरे बंधूच पाहिजेत. मागील 20 वर्षे आम्ही दोन भावांच्या युतीची वाट बघत होतो. ती युती सत्यात उतरल्यामुळे मुंबईवर ठाकरे बंधूंचाच दबदबा राहणार यात तीळमात्र शंका नाही.
महेश इंगळे, अँटॉप हिल

मुंबईचा विकास शिवसेनेमुळेच झाला आहे. मराठी माणसाचे अस्तित्व केवळ शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहे. मुंबई बिल्डरच्या घशात जाण्यापासून वाचवण्यासाठी पालिकेवर ठाकरेंच्याच सत्तेची गरज आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सत्ता आमचीच राहणार आहे. आम्ही शिवसेना-मनसे युतीच्या मराठी उमेदवाराला महापौर बनवून विरोधकांचा डाव उलथवणार आहोत. काल, आज आणि उद्याही मुंबई ठाकरेंची असणार आहे.
जयश्री शिंदे, अणुशक्तीनगर

मुंबईत ठाकरे ब्रँडचीच जादू चालणार आहे. मुंबई मराठी माणसाच्याच हातात राहणे आवश्यक आहे. यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत ही मराठी माणसांसाठी पर्वणीच आहे. सध्या सत्ताधाऱयांचे मुंबईवर अतिक्रमण करण्याचे नाना उपद्व्याप सुरू आहेत. मराठी माणसाला हद्दपार करण्याची कारस्थाने सुरू आहेत. यात मराठी माणूस अंधारात चाचपडत असताना ठाकरे बंधूंनी केलेली युती मुंबई वाचवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. आम्ही ठाकरे बंधूंसोबतच राहणार आणि मुंबई वाचवणार आहोत.
जयराम बाईत, धारावी

केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून मुंबई-महाराष्ट्रात मराठी माणसाला डावलले जात आहे. आम्ही भूमिपुत्र असताना आमचे हक्क चिरडले जात आहेत. महाराष्ट्रातील सगळे उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. हा अन्याय आम्ही का सहन करायचा? आता शिवसेना आणि मनसेची युती झाल्यामुळे मराठी माणसाची ताकद राक्षसी वृत्तीच्या भाजपला त्याची औकात कळेल. आम्ही त्यांचा मुंबई गिळण्याचा डाव नक्कीच उधळून लावणार आहोत.
विजया गावडे, मालाड





























































