
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ पवई येथील आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था ढासळली असून तेथील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महात्मा गांधी जयंतीदिनी देशभरात हाथरस घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींना कडक शासन करण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली गेली. आयआयटी मुंबईतील ‘आयआयटी-बी फॉर जस्टीस’ या ग्रूपच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी कॅम्पसबाहेर निदर्शने करून निषेध नोंदवला. पीडितेच्या कुटुंबीयांना तिच्यावर अंत्यसंस्कारही करू दिले गेले नाहीत आणि पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार करून प्रकरण दाबण्याचाच एकप्रकारे प्रयत्न केला असा आरोप या ग्रूपने केला.
या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून निदर्शक विद्यार्थ्यांनी त्याचीही चौकशी केली जावी अशी मागणी केली. पीडितेच्या कुटुंबीयांना मदत करण्याऐवजी उत्तर प्रदेशचे पोलीस त्यांना धमकावत आहेत. आम्ही त्या कुटुंबीयांसोबत आहोत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

























































