
पुणे शहरातील धानोरी परिसरातील कलवड खाणीत उडी मारलेल्या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. येरवडा अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तीन तासाच्या प्रयत्नानंतर तरूणाचा मृतदेह बाहेर काढला. यापूर्वीही या ठिकाणी उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहेत.
अनिल सुखदेव लष्करे (वय 24) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. यावेळी त्याचे दोन मित्र जगदीश गोरखनाथ नेतम (वय 19) आणि भुषण उत्तम पलांडे (वय 25) यांनाही अग्निशमन जवानांनी सुखरूप बाहेर काढले. दुपारी तीन वाजता अग्निशमन दलाला तरूण कलवड खाणीत बुडाला असल्याची माहिती मिळाली. तत्पूर्वी त्याचा मित्र जगदीश याने त्याला पोहता येत नसतानाही त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. तर भुषण याला पोहता येत होते परंतु, त्यालाही अनिलला वाचवता आले नाही. यावेळी घटनास्थही पोहचताच अग्निशमन जवानांनी जगदीश आणि भुषणला बाहेर काढले. दरम्यान, पाच वाजल्यानंतर सायंकाळच्या सुमारास अनिल लष्करेचा मृतदेह अग्निशामक दलाने बाहेर काढला.























































