शॉक लागून तरुणाचा मृत्यू

454

तालुक्यातील राजेवाडी येथे नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना शॉक लागल्याने एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आबासाहेब मारुती कुमटकर असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील राजेवाडी येथे आबासाहेब मारुती कुमटकर हा तरुण कुटुंबासोबत राहतो. नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने तो नेहमीप्रमाणे आज बुधवारी दुपारी एकच्या सुमारास येथे आला होता. त्याचे वडीलही तिथे होते. मात्र काही कामानिमित्त ते गावात गेले. त्यामुळे आबासाहेब भिंतीवर पाणी मारत होता. याच वेळी पाण्याची मोटर चालू करत असताना त्याला शॉक बसला व तो खाली पडला. हे बघताच शेजाऱ्यांनी त्याला तातडीने नान्नज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

त्यानंतर मृतदेह जामखेड येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकरी डॉ संजय वाघ यांनी दिलेल्या खबरीवरुन जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आबासाहेब हा अविवाहित होता. तो हळगाव येथील कारखान्यावर कामास होता. तसेच निर्व्यसनी, कष्टाळू, व मनमिळावू स्वभाव होता. त्यामुळे त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सायंकाळी राजेवाडी येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे भाऊ व आईवडील असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विठ्ठल चव्हाण हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या