विमान पकडण्यासाठी चक्क विमानतळाच्या अ‍ॅप्रनवर धावला, मुंबई विमानतळावर सुरक्षा यंत्रणांची तारांबळ

मुंबई विमानतळावर बोर्डिंग डेडलाइन चुकल्याने एक तरुण विमान पकडण्यासाठी चक्क विमानतळाच्या अ‍ॅप्रनवर धावल्याची घटना रविवारी घडली. पियुष सोनी असे या तरुणाचे नाव आहे. विमानतळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेने विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली.

पियुष हा कळंबोली येथील रहिवासी असून तो एअर इंडियाच्या विमानाने पाटण्याला चालला होता. यासाठी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचला. मात्र विमानतळावर पोहचायला उशीर झाल्याने त्याची बोर्डिंग डेडलाइन चुकली. याचदरम्यान विमान उड्डाण घेत असल्याचे समजताच पियुषने गेट क्र 42 आणि 43 दरम्यानच्या आपत्कालीन गेटमधून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर तो सुरक्षारक्षकांना चकवून विमानतळाच्या अ‍ॅप्रनवर धावत विमानाचा पाठलाग करू लागला. मात्र पियुष ज्या विमानाच्या मागे धावत होता ते गुजरातमधील भुज येथून आले होते.