
किरकोळ वादातून तरुणाची हत्या करणाऱयाला खार पोलिसांनी अवघ्या 8 तासात गजाआड केले. मोहंमद उमर असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी धीरेन प्रसादला पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
मोहंमद हा खार पूर्वच्या निर्मलनगर परिसरात राहत होता, तर धीरेन हा वांद्रे परिसरात राहतो. ते एकत्र मिळेल ते काम करायचे. चार दिवसांपूर्वी उमर आणि धीरेनचा पैशावरून वाद झाला होता. तेव्हा उमरने धीरेनला मारहाण केली. त्या मारहाणीचा राग धीरेनच्या मनात होता. शनिवारी सायंकाळी उमर दारू पिऊन खार परिसरात आला. दारू जास्त झाल्याने तो रस्त्यावरच झोपला. तेव्हा तेथे धीरेन आला. बदला घेण्याच्या हेतूने धीरेनने घटनास्थळी पडलेला दगड उमरच्या डोक्यात मारून पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून धीरेनला वांद्रे परिसरातून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने हत्येची कबुली दिली.

























































