झियान, शिवांश, अथर्व गटविजेते

आयडियल स्पोर्ट्स अॅकेडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या बीओबी ट्रॉफी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 8 वर्षांखालील गटात झियान नागरेचाने, 11 वर्षांखालील गटात शिवांश गिरीने आणि 14 वर्षांखालील गटात अथर्व देशमुखने सर्वाधिक 4.5 गुण घेत गटविजेतेपद पटकाविले. फिडे गुणांकित शिवांश गिरीने प्रथम स्थानावर झेप घेतांना निर्णायक पाचव्या फेरीपर्यंत आघाडीवर राहिलेल्या फिडे गुणांकितधैर्य बिजलवानचा (4 गुण) 28 व्या मिनिटाला पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा अॅड. प्रकाश लब्धे, अॅड. प्रेमानंद भोसले, डॉ. सचिन शिंदे, लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. विविध जिह्यांतील फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूंसह एकूण 162 खेळाडूंच्या सहभागाने रंगलेल्या स्पर्धेत 90 विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.