तरुणीने तीन महिन्यांत 33 वेळा तोडला ट्रॅफिक नियम, पोलिसांनी ठोठावला 24 लाखांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन महिन्यात 33 वेळा ट्रॅफिक नियम तोडले म्हणून एका तरुणीला चक्क 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याशिवाय तिला दीड वर्षं गाडी चालवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणीचं नाव मॅरी कॅश असं आहे. ती ब्रिटनच्या कार्डिफ इथली रहिवासी आहे. ऑगस्ट 2021 ते ऑक्टोबर 2021 या तीन महिन्यांत ती 33 वेळा वेगाने गाडी चालवताना कॅमेऱ्यात पकडली गेली. सीसीटीव्हीमध्ये तिच्या गाडीचा क्रमांक दिसत होता. तो आयर्लंड या देशात नोंदणीकृत झाल्याचं दिसून येत होतं.

एक दिवशी मॅरी एकाच दिवसात आठ वेळा वेगाचा नियम मोडताना दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी तिच्यावर कठोर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या. तिच्या गाडीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तिच्या गाडीचा नंबर सार्वजनिक केला. त्यानंतर तिच्या गाडीचा शोध घेऊन तिला अटक करण्यात आली. तिच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना किंवा विमा काहीही नव्हतं.

त्यानंतर तिला दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथे तिने वेगात गाडी चालवल्याचं मान्य केलं. त्यावर शिक्षा म्हणून 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आणि 18 महिने तिच्यावर बंधन घालण्यात आलं आहे.