सावकारांच्या त्रासाला कंटाळून पलूसमध्ये तरुणाची आत्महत्या

कुंडल व परिसरामध्ये खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून पलूस तालुक्यातील घोगाव येथील महेश मोहन चव्हाण या तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत महेश चव्हाण याने आत्महत्येपूर्वी कुटुंबीयांना व जिल्हा पोलीसप्रमुखांना पत्र पाठविल्याने सावकारीचा हा प्रकार उघडकीस आला.

आरोपी सचिन संपत आवटे यांच्यासह दिलीप मारुती आवटे, तुषार शंकर चव्हाण, बब्बर लाड, अक्षय गरदंडे, प्रदीप संपत देशमुख (सर्व रा. कुंडल) यांच्याविरोधात कुंडल पोलिसांत महेश चव्हाण याला व्याजाच्या पैशांचा तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.

महेश चव्हाण याने संबंधित सावकारांकडून व्यवसायासाठी व्याजाने पैसे घेतले होते. त्याच्या व्याजापोटी एक वर्षापासून त्याच्याकडून व्याजाची वसुली सुरू होती. सचिन संपत आवटे याने आतापर्यंत व्याजापोटी तीन लाख रुपये वसूल केले असून, आणखी 55 हजार रुपयांच्या मागणीसाठी तगादा लावला होता. तर, दिलीप मारुती आवटे हा दोन लाख 40 हजार रुपये, तुषार शंकर चव्हाण 56 हजार, बब्बर लाड दोन लाख 90 हजार, तर प्रदीप संपत देशमुख 35 हजार असे एकूण अंदाजे सात ते आठ लाख रकमेची व्याजापोटी मागणी करत त्रास देत होते. या सर्व पैशांच्या वसुलीचे काम अक्षय गरदंडे याच्यामार्फत केले जात होते. गरदंडेही महेश चव्हाण यास वारंवार फोन करून पैशांसाठी धमकी देत होता. या सर्वांच्या त्रासाला कंटाळून मोहन चव्हाण याने आत्महत्या केली.