
विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उमरगा येथे 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली आहे. आकाश अशोक जायम्हेत्रे (22, रा. उमरगा रेतू) असे या घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे. दत्ता सोनबा जायम्हेत्रे यांच्या शेतातील विहिरीत पडल्याने हा मृत्यू झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील मयत तरुण हा दत्ता जायम्हेत्रे यांच्या शेतात गेला असता विहिरीत पडून मृत्यू पावला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, वांजरवाडा येथे मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. जळकोट पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नरेश उस्तुर्गे हे करीत आहेत. या घटनेमुळे उमरगा रेतूवर शोककळा पसरली असून उमद्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.
























































