Chandrapur News – नो पार्किंगमध्ये उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील करंजी एमआयडीसी परिसरात घडली. मनोज बुरेवार (45) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून तो धानापूर येथील रहिवासी आहे. दुचाकीने गावी जात असताना त्यांच्या दुचाकी वाहनाची उभ्या ट्रकला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की मनोज यांचा जागीच मृत्यू झाला.

परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. रस्त्यावर नो -पार्किंगमध्ये उभी असलेली जड वाहने अपघाताला कारणीभूत ठरत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. यावेळी संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावरील 3 तास चक्काजाम केला होता. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे करत आहे.