लोणावळ्यात सनसेट पाहण्याचा मोह जीवावर बेतला, पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेहकर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक वसंत गिरी यांचा एकुलता एक मुलगा प्रज्वल वसंत गिरी (वय – 26) याचा लोणावळा येथील खंडाळा टेकडीवर झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सनसेट पाहताना पाय घसरून तो सुमारे 70 ते 80 फूट खोल दरीत कोसळल्याने त्याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारी रोजी प्रज्वल गिरी हा आपल्या नातेवाईकांसह लोणावळा येथे आला होता. लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी थोडा वेळ लागत असल्याने त्याने सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास सनसेट पॉईंट बघण्याचा निर्णय घेतला. हॉटेलमधून बाहेर पडून सर्वजण खंडाळा टेकडीवर सनसेट पाहण्यासाठी गेले होते.

सनसेट पाहत असताना अचानक प्रज्वलचा पाय घसरला आणि तो खोल 70 ते 80 फुट दरीत कोसळला. या अपघातात त्याला डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. डोंबिवली येथील नातेवाईक मंगेश रामकृष्ण गोसावी यांनी खोपोली पोलीस स्टेशनला घटनेची खबर दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्राथमिक सोपस्कार पूर्ण केले. पुढील तपासासाठी हा मर्ग लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.

प्रज्वल वसंत गिरी हा मेहकर येथील सर्वपरिचित सेवानिवृत्त प्राध्यापक वसंत गिरी यांचा एकुलता एक मुलगा होता. तो एमपीएससी तसेच नेट-सेट परीक्षेच्या तयारीसाठी पुणे येथे वास्तव्यास होता. त्याच्या अकाली निधनामुळे मेहकर शहरासह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, गिरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.