
किनगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या मोहगाव शिवारात आंब्याच्या झाडाखाली अज्ञात व्यक्तीचा खून करून एक मृतदेह टाकण्यात आला होता. या खून प्रकरणी मयताची ओळख पटवून खून करणार्या व्यक्तीस पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून हा खून केल्याची कबुली या आरोपीने दिली आहे.
14 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोहगाव रोड येथे शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीचा प्रेत डोक्याला जखम व बाजूला रक्ताने माखलेला दगड आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भादवि कलम 302 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तपासा दरम्यान सदर गुन्ह्यातील मयत अनोळखी व्यक्तीची ओळख निष्पन्न केल्यानंतर सदरील गुन्हा हा शिरसाटवाडी येथील तेजस शिरसाट याने केल्याची माहिती मिळाली. तेजस शिरसाठ याचा पोलीस शोध घेत होते. परंतु, तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलीस पथके तयार करून शोध घेण्यात येत होता. तो कोणत्याही नातेवाईकांच्या किंवा मित्राच्या संपर्कात नव्हता. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे हे पोलिसांसाठी जिकिरीचे व आव्हानात्मक काम होते. तो पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने पुणे येथून त्याला अटक केली. दारू पिताना झालेल्या किरकोळ शिवीगाळीवरून खून केल्याची कबुली दिली. त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी व अटकेसाठी भाऊसाहेब खंदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्यबोईनवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोखरे, पोलीस अमलदार शिवाजी तोपरपे, नागनाथ कातळे, सुनील श्रीरामे आदींनी परिश्रम घेतले.


























































